ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील एका हॉटेलसमोरच ट्रक चालकाची शुक्रवारी (दि. 24 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास चाकूने वार करुन अज्ञाताने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील खर्डी येथील हाॅटेल साहारा समोर घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राजेंद भगवान कदम (वय 33 वर्षे, रा. बानगाव, ता. नादगाव, जि. नाशिक), असे हत्या झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
जेवणासाठी थांबला होता
मृत ट्रक चालक राजेंद्र हा शहापूर तालुक्यातील खर्डी येथील हाॅटेल साहारामध्ये रात्रीच्या सुमारास जेवण करण्यासाठी आला होता. जेवण झाल्यानंतर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या ट्रक (क्र. एम एच 04 एफ डी 4681) जवळ जात असतानाच अज्ञात व्यक्तीने चालकावर चाकूचे वार करून त्याची निर्घृण हत्या केली. तर हत्या करून फरार झालेल्या आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.