ठाणे - व्हॉट्सअपवर पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची घटना भिवंडी शहरातील आमपाडा येथे घडली असून या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पतीने तिहेरी तलाक देताना उर्दू, अरबी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये व्हॉट्सअपवर मॅसेज पाठवून तलाक दिला आहे. तर व्हॉट्सअपद्वारे पत्नीस तलाक दिल्याची भिवंडी शहरातील ही पाचवी घटना आहे.
भिवंडीत पत्नीला तीन भाषांमध्ये तिहेरी तलाक; पतीविरोधात गुन्हा दाखल - ठाणे गुन्हे वार्ता
पत्नीला तीन भाषांमध्ये तिहेरी तलाक दिल्याची घटना भिवंडी शहरात घडली असून या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मो. जुनेद मो. यासीन अंसारी (३३) रा. आमपाडा चावीन्द्रा असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून २२ मार्च रोजी त्याने पत्नी हुमाबानोला मारहाण करून हाकलून दिले होते. पतीच्या जाचाला कंटाळून अखेर हुमाबानो या शहरातील नागाव येथे आपल्या वडिलांच्या घरी राहायला आल्या असता १० ते १२ सप्टेंबर या काळात पती जुनेद याने व्हॉट्सअपवर इंग्रजी तसेच अरबी व उर्दू भाषेत देखील तलाकचे मॅसेज पाठवले. तलाकचे मॅसेज पाहून पत्नी हुमाबानो यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत ट्रिपल तलाक दिल्याप्रकारणी पतीविरोधात तक्रार दिल्यानंतर शांतीनगर पोलोसांनी मो. जुनेद अंसारी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केंद्र सरकाराने मुस्लीम महिलांच्या सुरक्षेसाठी तिहरी तलाक कायदा लागू केल्यापासून एकट्या भिवंडीत व्हॉट्सअपवर पत्नीस तलाक दिल्याची ही पाचवी घटना आहे. यामुळे कायदा लागू करूनही ट्रिपल तलाकच्या घटना थांबत नसल्याचे दिसत आहे.