ठाणे - शहरातील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात होत असतील तर त्या प्रश्नी माहापालिका आयुक्त, संबधित अधिकारी यांना जबाबदार धरावे. यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी कडक शब्दांत पत्र लिहून अधिकाऱ्यांना सूचित करावे अशी विनंती माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अप आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांना केली. जागतिक रस्ते अपघात स्मृतिदिनानिमित्त अपघातात मृत झालेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजीत श्रद्धांजली कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे स्थानाकासमोर असलेल्या घनश्याम गुप्ते रस्त्यावरील खड्डे पाहून त्यांनी माहापालिका अभियंता अधिकारी महेश गुप्ते यांना रस्ते दुरुस्त होणार आहेत की नाही? असे विचारले, की त्याची तजवीज आम्हाला करावी लागेल असे फोनवर विचारले, त्यावर गुप्ते म्हणाले, की त्या ठिकाणच्या कंत्राटदाराने काम अडवून ठेवले आहे, त्यामुळे खड्डे जैसे थे आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण दोन दिवसात त्या कामाला सुरुवात करतो असे आश्वासन दिले. त्यामुळे शहरातील खड्डयांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे स्पष्ट झाले. केडीएमसी अधिकारी कामांकडे कानाडोळा करतात, अनेकदा स्थानिक नगरसेवक पाठपुरावा करतात पण अधिकारी पाठ फिरवतात असे सांगून त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे याना तातडीने कठोर शब्दात पत्र लिहावे असे सांगितले. ससाणे यांनीही रस्त्याची समस्या मोठी असून त्याचा परिणाम वाहतुकीवर होत असल्याचे स्पष्ट केले. तसेच वाहन चालकांनी जपून वाहन चालवावे असे आवाहन देखील केले. चव्हाण यांनी वाहनचालकांना विमा जरूर काढावा त्यासाठी केंद्र सरकारची अपघात विमा योजना असून दिवसाला 12 ते 15 रुपये स्वतःसाठी काढावे असे आवाहन केले.
हेही वाचा -खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी, मृताविरोधातच गुन्हा दाखल झाल्याचा धक्कादायक प्रकार