ठाणे - आदिवासी विवाहितेची सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील महाळुंगे येथील निर्जनस्थळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात बलात्कारासह हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिवासी विवाहित महिला इतर महिलांसोबत कामावर जात होती. ही महिला रविवारी सायंकाळी एसटी बसने महाळुंगे बस स्टॉपवरील दुकानातून सामान खरेदी करून घराच्या दिशेने निघाली होती. ती एकटीच रस्त्याने जात असताना तिला दोघांनी उचलून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तिच्याच साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केली. रात्री उशिरापर्यंत आपली पत्नी घरी परतली नाही म्हणून पतीने तिची चौकशी वहिनीकडे केली. त्यावेळी ती अन्य महिलांच्या पुढे घरी निघाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी पती महाळुंगे नाक्याकडे गेला. त्यावेळी दुकानदाराने मृत महिला साडेसात वाजण्याच्या सुमारास दुकानातून सामान घेऊन निघाल्याचे सांगितले. त्यावेळी भयभीत झालेल्या पतीने पत्नीचा शोध घेतला असता बंधाऱ्याच्या अलीकडच्या रस्त्याच्या कडेला त्याला छत्री व हातरुमाल पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने अधिक पुढे जाऊन पाहिले असता पत्नीच्या अंगावरील कपडे फाटलेल्या अवस्थेत ती निपचित पडल्याचे निदर्शनास आले. पतीने तत्काळ याची माहिती पाड्यातील नागरिकांना दिली.
हे ही वाचा -गुंगीचे औषध देवून अल्पवयीन मुलीवर 3 वर्षे वारंवार बलात्कार; आरोपींमध्ये पीडितेच्या आईचाही समावेश