ठाणे : पुणे पोलीस आयुक्त असताना आपल्या कामाने सर्वांची मने जिंकणाऱ्या आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी राज्यातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत, यासाठी कारागृह व सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यातील कारागृहांमध्ये 50 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या बंद्यांना स्वखर्चाने जाड बेडिंग (अंथरुण), उशी आणण्याची परवानी देण्यात आली आहे.
कारागृहातील समस्या बाबत आढावा बैठक :कारागृह विभागातील अडथळे, समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भात सर्व विभाग प्रमुख, सर्व कारागृह अधीक्षकांना परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या बैठकीला कारागृहाचे सर्व उपमहानिरीक्षक, कारागृह अधीक्षक उपस्थित होते.