ठाणे - निसर्ग चक्रीवादळामुळे कल्याण, डोंबिवली, भिवंडी, शहापूर, मुरबाडसह आसपासच्या ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला पहाटेपासूनच सुरुवात झाली होती. दुपारी 2 वाजल्यापासून जिल्ह्यात आधी जोरदार वारे वाहण्यास सुरुवात होऊन नंतर मुसळधार पाऊस पडला.
निसर्ग चक्रीवादळ : जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे उन्मळल्याने नुकसान
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यात ठीक-ठिकाणी झाडे उन्मळून पडली, शहरी भागात अग्निशमन दल, तर ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी ती बाजूला करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत
दुपारी 4 वाजल्यानंतर वाऱ्याची गती मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळाली. पावसाचा जोरही त्याप्रमाणात वाढला होता. दरम्यान, या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यात ठीक-ठिकाणी झाडे उन्मळून पडली, शहरी भागात अग्निशमन दल, तर ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी ती बाजूला करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. तर विद्युत वाहिन्यांवर अनेक ठिकाणी झाडं पडल्याने त्या-त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
दरम्यान, सायंकाळी साधारणपणे साडेपाच वाजता पाऊस थांबला आणि वाराही कमी झालेला पाहायला मिळाला. आत्तापर्यंत भिवंडी शहरात ७ झाडे, कल्याण - डोंबिवलीत १३ हून अधिक , शहापूर आणि मुरबाडमध्येही शेकडो झाडे उन्मळून पडल्याने काही ठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी वाहनांवरही झाडे कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगण्यात येत आहे.