ठाणे -24 जानेवारी हा सर्वत्र राष्ट्रीय कन्यादिन म्हणून साजरा केला जातो. कन्यादिनाचे औचित्य साधून डोंबिवलीच्या निवासी विभागातील उद्यानात आज देगावच्या अंगणवाडी जिल्हा परिषद - 2 केंद्रातर्फे राष्ट्रीय कन्यादिन साजरा करण्यात आला. यावेळी मुलींच्या नावाने वृक्षारोपणही करण्यात आले.
माहिती देताना केंद्र सेविका ज्योती पाटील शिक्षणाच्या शस्त्रामुळेच आजची महिला सक्षम ..
केंद्र सेविका ज्योती पाटील उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या, आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. शिक्षण हे शस्त्र आहे आणि या शस्त्रामुळेच आजची महिला सक्षम झाली आहे. कुणीही मुला-मुलीत कधीही भेदभाव करू नये. मुलीचे महत्व समाजाला कळावे आणि घटणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ व्हावी.
हेही वाचा -“लाल वादळ” ठाण्याच्या वेशीवर, लाॅंगमार्चमध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग
कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगताना ज्योती पाटील म्हणाल्या, जुन्या मतांच्या लोकांना नातूचा आग्रह असतो. मात्र, मुलगी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर झाली आहे. मुलीला जीवनात पन्नास-सत्तर नव्हे, तर शंभर टक्के महत्व द्यायला हवे. मुलगी ही धनाची पेटी असते, ती दोन्ही घरांचा उद्धार करते. जसा मुलगा हा वंशाचा दिवा म्हणता, तशी मुलगी ही पणती आहे. आई-वडिलांसह सासू-सासऱ्यांचा उद्धार करणाऱ्या मुलीचा साऱ्या समाजाने उद्धार केला पाहिजे, असे आवाहनही ज्योती पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केले.
बालविकास प्रकल्पांतर्गत राबवला कार्यक्रम..
एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा साखरे आणि प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी उषा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्र सेविका ज्योती पाटील, मनीषा साबळे, सुरेखा गिरी, संगीता जवरकर, मदतनीस श्वेता सुतार, हेमा कदम यांच्यासह केंद्राशी संबंधित पालक व त्यांचे पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -फिरण्यासाठी आलेल्या तरुणावर खारघरमध्ये गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू