भाईंदर Mira Bhaindar Municipal Corporation :भाईंदर पूर्वेच्या रामदेव पार्क परिसरात आरक्षण क्रमांक २३० च्या जागेचा देखील समावेश आहे. आता येथील मोठी ६०७ तर लहान २६६० अशी एकूण भारतीय प्रजातीची ३ हजार २६७ झाडे मुळासकट काढून त्याचे इतर ठिकाणी पुनर्रोपण करण्याचा विचार केला जात आहे. त्याकरीता नोटीस जारी करत, नागरिकांकडून हरकती व सूचना मनपाकडून मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान, यासाठी पुढील सात दिवसांची वेळ देण्यात आली. मात्र, यासंदर्भात सध्या तीनच हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.
पर्यावरण प्रेमी नाराज : मिरा भाईंदर शहरात तरण तलाव उभारण्यासाठी मनपाला राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. याच निधीतून उद्यानात झाडे लावलेल्या जागेत मोठ्या आकाराचे तरण तलाव उभारण्याच्या दृष्टीने पालिकेकडून ही कार्यवाही केली जात आहे. परंतु, यापूर्वीच्या अनेक उदाहरणे लक्षात घेता सर्वच झाडांचे पुनर्रोपण करणे अशक्य आहे. तशी जागा देखील मनपाकडे उपलब्ध नाही. तसंच यावर मोठ्या प्रमाणावर खर्च होईल. त्यामुळं झाडांचे पुनर्रोपण करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर कुऱ्हाड चालवण्याचा हा मनपाचा घाट असल्याचा आरोप करत आहे. मनपाच्या कार्यपद्धतीवर पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसंच नागरिकांना सध्यस्थितीत तरण तलावांची नव्हे तर झाडांची सर्वाधिक गरज आहे, म्हणून तात्काळ हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली जात आहे.