ठाणे- ठाणे रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक अडकून पडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. आनंद चाळके ( व.६५ रा. कळवा, विटावा), असे प्रवाशाचे नाव आहे. तब्बल तीन तासानंतर रेल्वे प्रशासनाला त्यांची सुटका करण्यात यश आले आहे.
कळवा विटावा येथील रहिवासी आनंद चाळके (व.६५) हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकावर सकाळी आले होते. जलद लोकल पकडण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर जाण्यासाठी त्यांनी फलाट क्रमांक ३-४ वरील लिफ्ट वापरली. लिफ्टमध्ये प्रवास करत असताना आनंद एकटेच होते. लिफ्ट सुरू झाल्यानंतर काही अंतरावर लिफ्ट अचानक बंद पडली. काही प्रवाशांना ही बाब लक्षात आल्याने त्यांनी आरपीएफ जवानांना याबद्दल कळविले. ही बातमी कळताच रेल्वे प्रशासनाची धावाधाव झाली. तातडीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लिफ्ट वर-खाली घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडकलेली लिफ्ट काही केल्या सुरू होईना.
अखेर, तब्बल अर्ध्या तासांनी ठाणे मनपा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मनपाचे अग्निशमन दलही लिफ्टमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात अयशस्वी राहीले. शेवटी रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत तब्बल ३ तासांनंतर लिफ्ट थोडी वर आणून चाळके यांची सुखरूप सुटका केली.