नवी मुंबई -पनवेल मनपा क्षेत्रात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रसारावर आळा घालण्यासाठी राज्यसरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील दुकाने आज ( मंगळवारी) बंद करण्यात आली. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयावर खारगरमधील व्यापारी वर्ग नाराज झाला आहे. दुकाने बंद करण्याच्या या निर्णयाविरोधात खारगरमधील व्यवसायिकांनी कळंबोली प्रभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत विरोध दर्शवला आहे.
मिनी लॉकडाऊनविरोधात व्यापारी वर्ग आक्रमक हेही वाचा -आरोग्यमंत्र्यांची अचानक मालेगावला भेट; सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयांची केली पाहणी
व्यापारी आक्रमक
कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत काही निर्बंध लावण्यात आले असून मिनी लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. शनिवार आणि रविवारी पूर्ण टाळेबंदी करण्यात आली आहे. इतर दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाची पनवेल परिसरात मंगळवारपासून कडक अंमलबजावणीला सुरुवात झाली. त्यानुसार खारघर परिसरातील दुकाने पोलिसांनी बंद केली आहेत. आणि जो व्यवसायिक नियम पाळणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या मिनी लॉकडाऊनमुळे व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे व्यवसायिक वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.
पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन पोलिसांची अडवली गाडी
राज्य सरकारच्या या निर्णयावर संतप्त झालेल्या व्यवसायिकांनी खारघरमध्ये पोलिसांची गाडी अडवत दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवला. पोलिसांनी त्या व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सरकारने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी पोलीस यंत्रणा करत असल्याची जाणीव संबंधितांना करून देण्यात आली.
हेही वाचा -मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव