महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्वात कमी मतदान सुशिक्षितांच्या डोंबिवलीत; तर सर्वाधिक दुर्गम शहापुरात - thane vidhansabha election

डोंबिवली हे सुशिक्षिताचे शहर म्हणून ओळखले जात असतानाही या शहरात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत झालेल्या कोणत्याही निवडणुकीत मतदानाची आकडेवारी ४५ टक्क्यांच्या पुढे सरकू शकलेली नाही.

ठाण्यातील मतदानाची टक्केवारी

By

Published : Oct 23, 2019, 2:07 AM IST

ठाणे- जिल्ह्यात सुशिक्षितांच्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघात मतदारांनी नेहमीप्रमाणे निरुत्साह दाखवला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरून ४०. ७२ टक्क्यांवर येऊन ठेपला. तर जिल्ह्यातील दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या शहापूर विधानसभा मतदारसंघात ६४.८० टक्के घसघशीत मतदान झाले. यामुळे सुशिक्षितांच्या डोंबिवली पेक्षा दुर्गम भागातील मतदार अधिक जागृत असल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे डोंबिवली हे सुशिक्षिताचे शहर म्हणून ओळखले जात असतानाही या शहरात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत झालेल्या कोणत्याही निवडणुकीत मतदानाची आकडेवारी ४५ टक्क्यांच्या पुढे सरकू शकलेली नाही. इतर शहरात वा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढताना दिसून येते. मात्र, डोंबिवली शहर परिसरात अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने निवडणुकीत मतदानाचा टक्का कमी झाला असल्याचा निष्कर्ष अनेक राजकीय तज्ज्ञांनी काढला.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवलीमध्ये ४३.६० टक्के मतदान झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डोंबिवलीमध्ये ४४ .७८ टक्के मतदान झाले. तर यंदा विधानसभेला ४०.७२ टक्के मतदान झाल्यामुळे यावेळीदेखील कमी मतदानाची डोंबिवलीची परंपरा कायम असल्याचे दिसून येते. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून मनसेचे मंदार हळबे, महायुतीचे रविंद्र चव्हाण, काँग्रेस (आघाडी) तर्फे राधिका गुप्ते-केतकर, बसपातर्फे दामोदर काकडेंसह एकूण ६ उमेदवार रिंगणात उतरले होते. या सहाही उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त झाले.

ठाण्यातील मतदानाची टक्केवारी

शहापूर विधानसभेत तालुक्यातील राजकारण ढवळून निघाल्याने आदिवासी-बिगर आदिवासी मुद्द्यावर मतदान झाल्याने यंदा मतदान १ टक्क्याने कमी झाले आहे. गेल्या वेळी ६५. ७८ , टक्के मतदान झाले होते. तर यंदा मात्र ६४. ८० मतदान होऊन शहापूर हा जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झालेला मतदारसंघ ठरला आहे.

४० वर्षांनंतरही दरोडा विरुद्ध बरोरा या नावांची प्रतिस्पर्धी जोडी मतदारांसमोर अस्तित्वाची लढाई लढणार आहे. पक्षाचा झेंडा बदलून दरोडा आणि बरोरा हे दोन्ही तुल्यबळ चेहरे शहापूर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात पहेलवानासारखे दंड थोपटून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. फक्त इकडचे तिकडे होऊन उमेदवार आणि कार्यकर्ते उलटेपालटे झाले. दोन्ही उमेदवारांसाठी ही शेवटची आणि अस्तित्वाची लढाई असल्याचे बोलले जात आहे. ४० वर्षांचा काळ पाहिला तर महादू बरोरा चारवेळा, दौलत दरोडा तीनवेळा आणि विद्यमान पांडुरंग बरोरा यांनी विधानसभेचे साडेचार वर्ष आमदार म्हणून सदस्यपद भूषवले.

ABOUT THE AUTHOR

...view details