ठाणे :ठाण्यातील दोन दिग्गज नेत्यांचे बालेकिल्ल्यातील इमारती धोकादायक असल्याचे वास्तव समोर आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभागांमधील एकूण 4 हजार 233 धोकादायक इमारती डेंजर झोनमध्ये आहेत. या इमारतींपैकी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड याच्या कळवा-मुंब्र्यात 1 हजार 513 इमारती धोकेदायक आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या वागळे इस्टेट कोपरी परिसरातील 1 हजार 534 इतक्या इमारती धोकादायक आहेत. ठाणे महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी घोषित केली आहे. मात्र या धोकादायक इमारती रिकाम्या कशा करणार? हा मोठा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडल्यास नागरिकांनी काय करावे ?असा सवाल ठाणेकर करत आहेत.
क्लस्टरची योजना कधी सुरू होणार :मागील १० वर्षांपासून फक्त क्लस्टर आला रे आला या घोषणा देऊन निवडणुका लढवल्या गेल्या. लोक मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचली तरी ठाणेकरांचे प्रश्न मार्गी लागत नसतील तर आता ठाण्यातून पंतप्रधान होण्याची वाट बघायची का? असा सवाल नागरीक करत आहेत. जितेंद्र आव्हाड हे म्हाडाचे मंत्री होते तरीदेखील त्यांच्या मतदारसंघात हजारोंच्या संख्येने धोकादायक इमारती उभ्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ज्या भागात राहत होते, त्या भागात धोकादायक इमारत कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला, पण सुधारणा झाली नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा त्याच भागात तीन ते चारवेळा सत्कार झाला. पण कामे मात्र अजून झाली नाहीत, त्यामुळे नागरिकांनी आता इमारतीवरून उडी मारून जीव द्यायचा का? असा सवाल मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांना विचारला आहे.
इतक्या इमारती आहेत डेंजर झोनमध्ये :महापालिकेकडून नोंदवण्यात आलेल्या यादीमध्ये मुंब्रा प्रभागात 1 हजार 340, वागळे इस्टेटमध्ये 1 हजार 101, दिवा प्रभागात 654 , नौपाडा-कोपरी 433, लोकमान्य- सावरकरनगर 221, कळवा 173, उथळसर 153, माजीवडा मानपाडा 158 इमारती धोकादायक आहेत. तर यंदा सर्वेक्षणामध्ये वर्तकनगरमध्ये एकही धोकादायक इमारत नसल्याचे समोर आले आहे. मुंब्रा आणि वागळे इस्टेट या दाट लोकवस्तीच्या भागामध्ये सर्वाधिक धोकादायक इमारती असल्यामुळे या भागातील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाळ्यामध्ये या भागात दुर्घटना घडण्याची धास्ती असल्याने नागरिकांच्या मनात असताना ते जीव मुठीत घेऊन या इमारतीमध्ये वास्तव्य करत आहेत.
दुरुस्तीवर आलेल्या इमारती या गटात मोडतात : ठाणे महापालिकेकडून दरवर्षी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. शहरातील या धोकादायक इमारतींची प्रभागनिहाय यादी महापालिकेकडून जाहीर करण्यात येते. अती धोकादायक इमारतींना सी - १ संबोधले जाते. इमारत रिकामी करून दुरूस्ती करण्यायोग्य असेल तर त्याला सी - २ ए. तर इमारतीमध्ये राहून दुरूस्ती करता येण्यासारख्या इमारती सी -२ बी या श्रेणीमध्ये मोडतात. तर चौथ्या प्रकारामध्ये सी - ३ गटातील इमारती किरकोळ दुरूस्ती करून वापरण्यायोग्य असतात.