ठाणे - भिवंडी पोलीस उपायुक्त क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हुक्का पार्लर सुरू असल्याची ओरड होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आपले अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एका गोदामात अवैध हुक्का पार्लरमध्ये वापरले जाणारे साहित्य साठवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात ३ कोटी रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत.
तंबाखूजन्य पदार्थांच्या गोदामावर छापा; तीन कोटींचा साठा जप्त
ठाण्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. पोलीस उपायुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंदे होत असल्याची तक्रारही वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता धडक कारवाई हाती घेतली आहे.
जिल्ह्यात हुक्का पार्लरचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. हुक्का पार्लरमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी विविध तंबाखू जन्य पदार्थची मागणी मोठ्या प्रमाणात असते. अशा पदार्थांचा गोदामात मोठा साठा करून ठेवल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत क्षेत्रातील पारसनाथ गोदाम संकुलात छापा टाकला. या कारवाईत ३ कोटी ८ लाख ९६ हजार ७६० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गोदाम मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला. इरफान मोहम्मद अमीन सिद्दीकी (रा.माझगाव मुंबई) असे गोदाम मालकाचे तर वफैसल रईस खान ( रा. भिवंडी) असे गोदाम व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईने अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.