नवी मुंबई - सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवी मुंबईतील 'अभाविप' मार्फत भव्य १ हजार १११ फूट तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी तरुणाईच्या ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ च्या घोषणांनी संपूर्ण परिसरामध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. नवी मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्तावर उतरली.
नवी मुंबईत ‘अभाविप'कडून १,१११ फूट राष्ट्रध्वजासह तिरंगा यात्रा हेही वाचा -'झेंड्यापेक्षा विचार महत्वाचा, राज ठाकरेंची भाजपविरोधी धार कमी होणार नाही'
या ११११ फुट तिरंगा यात्रेचे उद्घाटन अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ, माजी खासदार संजीव नाईक यांनी केले. त्यानंतर ही यात्रा ब्ल्यू डायमंड चौक ते राजीव गांधी महाविद्यालय अशी काढण्यात आली.
देशामध्ये काही विद्यापीठांमध्ये देशविरोधी घोषणा देऊन समाजामध्ये अशांतता पसरवण्याचे काम करत असताना अशा प्रकारे तिरंगा हातात घेऊन एवढी भव्य रॅली काढून आपण त्यांना उत्तर दिले, की देशातील २-३ विद्यापीठे म्हणजे देश नाही. या देशामधील युवक हा ‘भारत माता की जय’ म्हणणाऱ्यांचा आहे आणि राहील, असे प्रतिपादन प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी केले.
तसेच महाविद्यालय आणि शाळांमधून आवश्यक देशभक्तीचे संस्कार अभाविप चांगल्या प्रकारे करत आहे. हा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे अभिनेता आरोह वेलणकर म्हणाले.
यावेळी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक देखील उपस्थित होते. विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आजचा युवक हा देशाला महासत्ता बनवणार आहे, आणि त्यासाठी आवश्यक देशभक्ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.