ठाणे:या इमारतीत तळ मजला व पहिल्या मजल्यावर एका कंपनीचे गोडाऊन होते तर दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर रहिवासी खोल्या बनविण्यात आल्या होत्या. ज्यात भाडेतत्त्वावर नागरिक राहत होते. घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला घटनास्थळी अग्निशमन दल, रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा दाखल होत बचाव कार्य सुरू केले. त्यांनतर ठाणे येथील टीडीआरएफ पथक दाखल होत बचाव कार्य सुरू करण्यात आले. तर भिवंडीत झालेल्या वाहतूक कोंडीमुळे एनडीआरएफ पथक घटनास्थळी पोहोचायला एक ते दीड तास अडकून पडले होते.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर - भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. भिवंडी तालुक्यातील वळपाडा ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयांमध्ये हलवून उपचार सुरू करावेत असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
त्यामुळे वाचला कामगारांचा जीव: वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळपाडा येथील वर्धमान ही तळ अधिक तीन मजली इमारत होती. ही इमारत २०१४ मध्ये इंद्रपाला गुरुनाथ पाटील यांनी बनविली होती. या इमारतीच्या तळमजल्यावर एम आर के फुड्स या कंपनीचे चायनीज फूड प्रोडक्ट सप्लाय करणारे गोदाम असून पहिल्या मजल्यावर साठवणुकीचे गोदाम आहे. एम. आर. के. फुडस कंपनीमध्ये सुमारे ५५ कामगार होते. जेवणाची वेळ असल्याने अनेक कामगार गोदामाबाहेर असल्याने अनेकांना जीवदान मिळाले असून या कंपनीत अजून सात जण अडकल्याची भीती तेथील कामगार अनिल तायडे याने सुरुवातीला व्यक्त केली आहे.
इमारतीवर बनविले टॉवर:धक्कादायक म्हणजे या कमकुवत इमारती वर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता. ज्यामुळे इमारतीवर अतिरिक्त भार पडला होता. इमारतीच्या बांधकामात सुरक्षेची कोणतीही बाब बांधकाम विकासकाने लक्षात घेतलेली नसल्याने ही इमारत कोसळली आहे.
'या' अधिकाऱ्यांची उपस्थिती:घटनास्थळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, तहसीलदार अधिक पाटील, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, उपविभागीय अमित सानप, गट विकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांच्यासह महसूल, पोलीस व बचाव व वैद्यकीय पथक उपस्थित होते.
इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट गरजेचे:भिवंडीतील ग्रामीण भागातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची वेळ आली आहे. या भागात एमएमआरडीए महसूल विभाग व स्थानिक ग्रामपंचायत हे वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करीत असून यांपैकी एकाने जबाबदारीने घेऊन येथील दुर्घटना टाळण्यासाठी सर्वेक्षण करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया मंत्री कपिल पाटील यांनी दिली.
मयतांची नावे: नवनाथ सावंत (३५ वर्षे, लक्ष्मी रवी महतो (३२ वर्षे) आणि दोन अनोळखी इसम
जखमींची नावे: सोनाली परमेश्वर कांबळे (२२ वर्षे), शिवकुमार परमेश्वर कांबळे (अडीच वर्षे), मुख्तार रोशन मंसुरी (२६ वर्षे), चींकु रवी महतो (३ वर्षे), प्रिन्स रवी महतो (५ वर्षे), विकासकुमार मुकेश रावल (१८ वर्षे), उदयभान मुनीराम यादव (२९ वर्षे) , अनिता (३० वर्षे) आणि उज्वला कांबळे (३० वर्षे)
त्यांना न्यायाची प्रतीक्षा: ठाणे इमारत कोसळून १० वर्षे उलटली तरी पीडित न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात इमारत कोसळून 74 जणांचा मृत्यू झाला आणि 60 हून अधिक जण जखमी झाल्याच्या दहा वर्षांनंतरही पीडित आणि त्यांचे कुटुंबीय प्रशासकीय मदतीपासून वंचित आहेत. . इमारत कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या ७४ लोकांमध्ये १८ मुलांचा समावेश होता. इमारतीतील रहिवाशांमध्ये बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबांचा समावेश होता.
असा घडला अपघात:मुंब्रा टाउनशिपमधील लकी कंपाऊंड येथे असलेल्या 'आदर्श' इमारतीला 4 एप्रिल 2013 रोजी अपघात झाला होता. त्यानंतर या प्रकरणात वरिष्ठ नागरी अधिकारी, मध्यस्थ, बिल्डर, कंत्राटदार, एक नगरसेवक आणि पोलिसांसह 27 जणांची नावे आहेत. त्यांना अटक करून नंतर जामीन मंजूर करण्यात आला.
आरोपींवर 'ही' कलमे लावण्यात आली:या प्रकरणातील आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 304 (हत्येची रक्कम नसून दोषी हत्या), 336, 337, 338 (सर्व मानवी जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणण्यासाठी अविचारीपणे किंवा निष्काळजीपणे केलेल्या कृतीशी संबंधित) अंतर्गत आरोपांचा सामना करत आहेत. 308 (दोषी हत्येचा प्रयत्न), 120B (गुन्हेगारी कट) आणि 34 (सामान्य हेतू), तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी.
ठाणे जिल्ह्यातील इमारत दुर्घटनांच्या घटना:
3 सप्टेंबर, 2021:भिवंडी महापालिका क्षेत्रात इमारत कोसळून एका रहिवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यात नऊ जण जखमी झाले होते.
20 जुलै, 2021 : ठाण्याच्या कळवा परिसरात सोमवारी संध्याकाळी भूस्खलनामुळे इमारत कोसळून चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इमारत कोसळून चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तर ढिगाऱ्याखालून दोन जणांना वाचवण्यात यश आले होते.