ठाणे - खोपट परिसरात राहणाऱ्या करुणा संदीप ठाणगे यांच्या घरातील ३६ तोळे सोने अज्ञात चोरटयांनी लांबवले. ही घटना २३ ऑक्टोबरला घडली होती. याबाबत नौपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून २६ तोळे सोने, गुन्ह्यात वापरलेली गाडी असा ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२३ ऑक्टोबरला चोरी झाल्यानंतर पोलिसांच्या हाती कुठलाच पुरावा नव्हता. पोलिसांनी फिर्यादी ठाणगे राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केली. त्यातून पोलिसांना घरफोडी करणाऱ्या आरोपींची ओळख पटली. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात दिसणारे आरोपी बाबू जमालुद्दीन खान (रा. गोवंडी), संजय रत्ना कांबळे (रा. दिवा, ठाणे), दत्ताराम इंगळे (रा. गोवंडी) या तिघांना पोलिसांनी अटक केली.