ठाणे - सराफादुकान लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी अंदाधूंद गोळीवर करून तिघांना जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात दुकानाचे मालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासह दोघा जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील पश्चिम परिसरात सुर्वेदयनगरात असलेल्या भवानी सराफा दुकानात घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या दुकान मालकाचे नाव भिषण सिंग दुसाना असून यांच्या पायाला गोळी लागली आहे. तर चरण दुसाना आणि लक्ष्मण दूसाना यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले आहे.
दोन दुचाकीवर आलेल्या चार दरोडेखोरांनी केला गोळीबार -
भरदिवसा दोन दुचाकीवर आलेल्या चार जणांनी सराफा दुकानात गोळीबार केला. हे अज्ञात हल्लेखोर दुकान लुटण्याच्या उद्देशाने आले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. या गोळीबारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.