ठाणे - डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात चोर आणि पोलिसांमध्ये फिल्मी स्टाईल थरार पाहायला मिळाला. लावलेल्या सापळ्यातून धूम ठोकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आले. हे तिघेही चोरटे अल्पवयीन जरी असले तरीही युट्युबवर चोरीचे प्रशिक्षण घेऊन दुचाक्या लांबविण्यात तरबेज असल्याचे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या 7 दुचाक्यांवरून दिसून येते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या लॉकडाऊन काळात सर्वत्र निरव शांतता असल्याने गुन्हेगारांनी कल्याण-डोंबिवली पट्ट्यात रस्ते, इमारतींच्या आवारात पार्क केलेली वाहने चोरण्याचा सपाटा लावला असल्याने वाहनधारकांसह पोलिसची चक्रावले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी गुन्हेगारांची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सक्त ताकीद दिली आहे. याच दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि दादाहरी चौरे आणि त्यांच्या पथकाच्या हाती 3 सराईत चोरटे लागले आहेत.
सपोआ जय मोरे आणि वपोनि दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे फौजदार अनंत लांब, विजय कोळी, मधुकर घोडसरे, संदीप बर्वे, प्रवीण किनरे, संतोष वायकर, भैय्यासाहेब अहिरे, विजय कोळी शोध घेत असतानाच या पथकाने एमआयडीसीच्या फेज 1 परिसरात फिल्डिंग लावली होती.
जवळपास दोन-अडीच तासांच्या प्रतिक्षेनंतर घर्डा केमिकल्स समोरून तिघेजण एकाच दुचाकीवरून येताना दिसले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा देऊनही या त्रिकुटाने धूम ठोकली. मात्र, पथकाने थरारक पाठलाग करून या त्रिकुटाच्या फर्लांगभर अंतरावर तिघांची गाठोडी वळली. चौकशीदरम्यान बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या कोळेगावात राहणाऱ्या या चोरट्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरल्याची कबूली दिली. मात्र, संशय अधिकच बळावल्यानंतर अधिक सखोल चौकशी केली असता या चोरट्यांनी आणखी 6 दुचाक्या चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आतापर्यंत या त्रिकुटाकडून 8 लाख 25 हजार रुपये किमतीच्या 7 दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. या सर्व दुचाक्या त्यांनी राहत असलेल्या परिसरात लपवून ठेवल्या होत्या. त्यांना बाल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार या तिन्ही आरोपींची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे फौजदार अनंत लांब यांनी सांगितले.
युट्युब पाहून घेतले प्रशिक्षण -
चौकशी दरम्यान चोरट्यांनी दिलेल्या धक्कादायक कबुलीमुळे पोलिसही अवाक् झाले. युट्युबवर दुचाक्या चोरीचे प्रशिक्षण घेऊन या चोरट्यांनी एक्सो ब्लेड, कटर, फ्यूज, आदी सामान खरेदी केले. पेट्रोल टाकून फिरणे, धाब्यांवर मौजमज्जा करणे, चोरलेल्या दुचाक्या कमी किमतीत विकण्यासाठी गिऱ्हाईकाचा शोध घेणे, असा या चोरट्यांचा नित्यक्रम होता. अशाच एकाला 10 हजारांत महागडी दुचाकी विकण्याचे आमिष दाखवले. संशय आल्याने या गिऱ्हाईकाने संपर्क साधल्यामुळे सराईत गुन्हेगार हाती लागल्याचे फौजदार अनंत लांब यांनी सांगितले.