भिवंडी (ठाणे) - भिवंडी तालुक्यातील मानकोली अंजुरफाटा-चिंचोटी येथील रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर सतत लहान-मोठे अपघात घडत असतात. दोन दिवसांपूर्वी मनसे कार्यर्त्यांनी या मार्गावरील टोलनाका फोडला होता. रविवारी (दि. 22 ऑगस्ट) आपल्या चिमुकलीसह रक्षाबंधानासाठी जाणाऱ्या दाम्पत्याची दुचाकी खड्ड्यात आदळल्याने अपघात झाला. हा अपघान पायगाव येथे दुपारच्या सुमारास झाला असून दुचाकीवरील तिघेही जखमी आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुशीला संदेश गोऱ्हे (वय 21 वर्षे), संदेश गोऱ्हे (वय 26 वर्षे) व त्यांची दीड वर्षाची मुलगी वैभवी (सर्व रा. कामण), असे जखमींची नावे आहेत.
तासभर रस्त्यावरच जखमी अवस्थेत तिघेही पडून
रक्षाबंधनाचा सण असल्याने जखमी सुशीला गोऱ्हे या आपल्या माहेरी पायगाव ब्राह्मणपाडा येथे पती व मुलीसह दुचाकीवरून येत होत्या. त्यावेळी पायगावजवळ रस्त्यावतील खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळल्याने तिघेही दुचाकीवरून खाली पडले. झालेल्या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले असून तिघांनाही स्थानिकांच्या मदतीने अंजुरफाटा येथील खासगी रुगणालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सुमारे एक तास जखमी रस्त्यावरच होते. रुग्णालयात नेण्यासाठी सुप्रीम इन्फ्रा टोल कंपनीची रुग्णवाहिकाही याठिकाणी आली नव्हती. स्थानिक रिक्षावाल्यांच्या मदतीने हितेश तांगडी यांनी जखमींना खारबाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, जखम जास्त असल्याने पुढील उपचारासाठी अंजुरफाटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.