ठाणे -ठाण्यातील मुख्य बाजारात असलेल्या टाऊन्स बाजार सुपरमार्केट या दुकानात २३ मे रोजी रात्री तीन आणि साडे तीनच्या दरम्यान धाडसी दरोडा पडला होता. तीन अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील १ लाख १२ हजारांची चिल्लर आणि ३३ हजारांच्या नोटा असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लुटला होता. या चिल्लर चोरांना पकडण्यात चार दिवसानंतर यश आले आहे.
ठाण्यात तीन चिल्लरचोर गजाआड साथीदारांना संपूर्ण लुटीसह घेतले ताब्यात -
तीन अज्ञात चोरट्यांनी २३ मे रोजी टाऊन बाजार सुपरमार्केटमध्ये दरोडा टाकला होता. त्यांनी दुकानातील १ लाख ४५ हजारांचा ऐवज लुटला होता. यावेळी रस्त्यावर रिक्षा उभी करून त्यांनी ही लूट पळविली होती. या घटनास्थळाची ठाणेनगर पोलिसांनी पाहणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी, पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही आणि तांत्रिकदृष्ट्या तपास करून सदर गुन्ह्यातील एका आरोपीला कोलशेत येथून अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीवरून इतर दोन साथीदारांना संपूर्ण लुटीसह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. केवळ चार दिवसात ठाणेनगर पोलिसांनी हे यश संपादन केले आहे.
का केली चिल्लर चोरी? -
सामान्यतः सर्व दुकानदार मोठी रोख रक्कम दुकानात ठेवत नाही अशा वेळी फक्त चिल्लर गल्ल्यात असते. त्यामुळे ही चिल्लरच चोरट्याना मिळते. मात्र ही चिल्लर वजनाने जास्त असल्यामुळे एकटा चोर हे काम करू शकत नाही. त्यासाठी आणखी साथीदारांची गरज भासते. या संशयावरूना चोरीत सहभागी आणखी दोन साथीदारांना पकडण्यात यश आले.
हेही वाचा - आईचा आत्महत्येचा प्रयत्न, अन् दोन चिमुकल्यांना गमवावा लागला जीव