ठाणे- लॉकडाऊन काळात झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तीन जणांनी २ हजार रुपयांच्या बनावट नोटा छापून बाजारात चालवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांनाही वागळे गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ८५ लाख ४५ हजाराच्या बनावट नोटा, संगणक, प्रिंटर, पेपर्स रिम, शाई, कटर, स्केल, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला. अटकेनंतर त्यांना न्यायालयात दाखल केले असता, त्यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.
दोन हजाराच्या बनावट नोटा जप्त वागळे युनिटने अटक केलेल्या आरोपींमध्ये सचिन गंगाराम आगरे (२९) रा. मु.पो. कळंबट ता-चिपळूण, जि -रत्नागिरी, आरोपी मन्सूर हुसेन खान(४५) रा. बानमोहल्ला. शिराळ ता-चिपळूण जि रत्नागिरी आणि आरोपी चंद्रकांत महादेव माने(४५) रा. रूम नं १७ हकीमजी रुकमानजी चाळ , कुर्ला अंधेरी रॉड, साकीनाका यांचा समावेश आहे.
४० लाखाचे कर्ज फेडण्यासाठी-
यातील आरोपी सचिन याला संगणकाचे चांगले ज्ञान आहे. तो दुबईला नौकरीसाठी जाणार होता. मात्र त्याला एजंटने दगा दिला. त्यामुळे तो मन्सूर खान याच्या झेरॉक्सच्या दुकानात काम करीत होता. तर आरोपी मन्सूर खान हा झेरॉक्सचे दुकान चालवीत होता. तर आरोपी चंद्रकांत महादेव माने याचे कोल्हापूरला सोन्या-चांदीचे दुकान होते. ते लॉकडाऊन मध्ये बंद झाले. ४० लाखाचे कर्ज झाले. म्हणून या तिघांनी लॉकडाऊनमध्ये झालेल्या कर्जाची परत फेड करण्यासाठी तिघांच्या युक्त्या वापरून छपाई प्रिंटर, स्कॅनर, सॉफ्टवेअरचा वापर करून २ हजाराच्या बनावट नोटा छापल्या आणि त्या बाजारात वटविण्याचा प्रयत्न कापूरबावडी परिसरात केला.
भारतीय चलनातील बनावट नोटा चालविण्यासाठी कापूरबावडी सर्कल येथील बसस्टॉपच्या समोर २ हजाराच्या बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासवून वटविण्याचा प्रयत्न करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने त्या तिघांना ताब्यात घेतले. बनावट नोटा छपाईसाठी लागणाऱ्या साहित्यासह ८५ लाख ४५ हजाराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.
नोटांचा नंबर वेगळा
पोलिसांना सापडलेल्या बनावट नोटांमध्ये सॉफ्टवेअर आणि प्रिंटर सोबतच आरोपींनी स्क्रीन प्रिंटींगची मदत घेतली होती. विशेषतः या बनावट नोटांचे सिरीयल नंबर मात्र वेगवेगळे होते, याची दक्षता आरोपींनी घेतलेली होती. त्यामुळे संशय येत नव्हता. दरम्यान या नोटा दैनंदिन व्यवहारात वापरण्याचा मनोदय आरोपींचा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक आरोपीच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४८९(अ), ४८९(ब ), ४८९(क ) आणि ३४ प्रमाणे गुहा दाखल केला. त्यांना न्यायालयात नेले असता त्यांना १४ डिसेंबर, पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.