ठाणे :कल्याण पूर्वेतील कशिष डान्स बारचे मॅनेजर भीम रामेश्वर सिंग (वय ३६) हे २८ मे रोजी बार बंद करून पहाटेच्या सुमारास बाईकने आपल्या घरी जात होते. त्यावेळी पहाटेच्या २ वाजून २० मिनिटांनी त्यांची बाईक कल्याण मंगलरोड वरील काकाचा ढाब्या समोर येताच, तिघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यांच्या जवळील दीड लाखाची रोकड तसेच दुचाकी घेऊन तीन आरोपी पळून गेले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हल्ला करून लुटमार करणाऱ्या तीन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
परिसरात भीतीचे वातावरण : त्यापाठोपाठ याच बारच्या एका वेटरलाही काही दिवसांनी पहाटेच्या सुमारास चाकूने वार करून, लुटमार केल्याचा गुन्हा मानपाडा परिसरात घडला होता. या दोन्ही गुन्ह्यांतील गुन्हेगारांचा शोध सुरू असतानाच, पुन्हा कल्याण रंगीला ओर्केस्टा बारमध्ये कमर्चारी अक्केश चौधरी (वय ३५) हे ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास बारचे काम आटपून पहाटे सव्वा दोन वाजता घरी निघाले होते. त्याच सुमारास त्यांनाही भरस्त्यातच गाठून बेदम मारहाण करून लुटमार केल्याची घटना घडल्याने, कल्याण डोंबिवली परिसरातील डान्सबार मधील कर्मचारी व मालक यामध्ये भीतीचे वातावरण होते.
आरोपीला घेतले ताब्यात : याच गुन्ह्यांचा कोळसेवाडी आणि मानपाडा तसेच कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. तपास दरम्यान कल्याण गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलीस पथकाने गुन्हा घडलेल्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही तपासात आरोपीचा शोध सुरू करत आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सिरसाठ यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे तिन्ही आरोपी कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे आंबिवली परिसरात सापळा रचून प्रेमकुमार गोस्वामी, सुरज विश्वकर्मा, नाबीर शेख या तिघांना ताब्यात घेतले.