ठाणे - एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीचा तुडवडा जाणत असताना कोरोनाच्या लसी समजून पोलिओच्या लसीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ आरोग्य केंद्रामध्ये समोर आली आहे. रविवारी (दि. 23 मे) मध्यरात्रीच्या सुमारास आरोग्य केंद्राच्या खिडकीच्या ग्रील तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत चोरी केली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मांगरूळच्या या आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. मात्र, आरोग्य केंद्रात लस नसल्याने चोरट्यांनी पोलिओच्या लसी लंपास केल्या. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
फ्रिजमध्ये असलेल्या पोलिओच्या लस चोरट्यांच्या हाती
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी मांगरूळ आरोग्य केंद्रात सुरुवात करण्यात आली आहे. या रुग्णालयात दररोज सकाळी बदलापूर येथून कोरोना प्रतिबंधक लसी येत असतात. मात्र, रविवारी मध्य रात्रीच्या सुमारास लस रुग्णालयात असतील या आशेने चोरट्यांनी रुग्णालयात प्रवेश केला होता. रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर रुग्णालयातील फ्रिजमध्ये असलेल्या पोलिओच्या लस चोरट्यांच्या हाती लागल्या आणि त्यांनी त्याच घेऊन रुग्णालयातून पोबारा केला आहे. मात्र, सोमवारी सकाळी आरोग्य केंद्रामधील अधिकाऱ्यांनी रुग्णालयात प्रवेश केला असता, रुग्णालयातील फ्रिजमध्ये पोलिओच्या लसी नसल्याचे समोर आले आहे.