नवी मुंबई - लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लूटणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी जेरबंद केले आहे. अटकेतील आरोपी हे सराईत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 18 फेब्रुवारीला जिग्नेश शहा या प्रवाशाला या टोळीने लुटले होते.
बंदुकीचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड याबाबत अधिक माहिती अशी की, 18 फेब्रुवारीला जिग्नेश शहा नावाची व्यक्ती कामावरून डोंबिवली येथून त्यांच्या घरी जाण्यासाठी घणसोली रेल्वे स्टेशन समोरील ठाणे बेलापूर रोडलगत असलेल्या सर्विस रोडवर शेअर टॅक्सीने प्रवास करण्यासाठी आली होती. त्या ठिकाणी एका पांढऱ्या रंगाच्या मारुती इको गाडीमध्ये चालक व 3 प्रवासी बसले होते. यांनी शहा यांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून गाडीत बसविले.
दरम्यान, गाडी महापे शीळ रस्ताने जात असताना मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने शहा यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि त्यांच्या पाकिटातील 1 हजार रुपये रोख आणि त्यांच्याकडील एटीएम व मोबाईल फोन काढून घेतला. या चारही आरोपींनी म्हापे व तुर्भे परिसरात शहा यांना धकावून एटीएमचे पिन नंबर मागितले. त्यानंतर तुर्भे एमआयडीसी परिसरातील एटीएममधून शहा यांच्या कार्डद्वारे 36 हजार रुपयांची रोख रक्कम काढली. त्यानंतर शहा यांना म्हापे परिसरात शीळ फाटा रोडवर सोडून दिले.
याप्रकरणी जिग्नेश शहा यांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान या प्रकरणी तपास करत पोलिसांनी 4 अरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून 1 देशी बनावटीचे काळ्या रंगाचे पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे आणि 1 चाकू हस्तगत करण्यात आला आहे.