नवी मुंबई- खारघरमध्ये मोबाईल शॉप फोडून चोरी करणाऱ्या ३ चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून ४५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीचे मोबाईल परराज्यात मागणीनुसार पाठवले जाणार होते.
३० ऑगस्टला खारघर येथे मोबाईल शॉप फोडल्याचा गुन्हा घडला होता. गॅस कटरने शटर कापून दुकानात चोरटे शिरले होते व दुकान लुटण्यात आले होते. चोरीत ५० लाखाच्या जवळपास किमतीचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते. एवढेच नव्हे तर, दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरण्यात आला होता. त्यामुळे गुन्हेगारांना पकडणे हे पोलिसांसाठी आव्हानात्मक झाले होते. तरीही खारघर पोलीस व गुन्हे शाखा पोलीस तपास करत होते. या प्रकरणी गुन्हे शाखा प्रभारी उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक एन.बी. कोल्हटकर, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, राजेश गज्जल, निलेश तांबे, संजय पवार, आदींचे पथक तयार करण्यात आले. तपासात काही संशयितांची नावे समोर आली. त्याआधारे मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून शफिकउल्ला उर्फ सोनू अतिकउल्ला (वय २४), अयान उर्फ निसार उर्फ बिट्टू रफी अहमद शेख (वय २८) व इम्रान मोहम्मद उर्फ इम्मू बिंदू अन्सारी (वय २५) यांना अटक करण्यात आले.