ठाणे -जिल्ह्याला दिलासा देणारी बातमी आहे. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी १५७ ग्रामपंचायतींमध्ये गेल्या महिन्याभरात एकही कोरोना रुग्ण आढळून आलेले नाही. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १७२ गावांमध्ये कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या नियमाचे पालन केल्याने यश मिळाल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका जिल्ह्यातील ग्रामीण भागांना बसला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध उपाययोजना करण्यात येत होत्या. त्यामुळे गावांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात जिल्हा परिषदेला यश आले. त्याचबरोबर कोरोनाबाबत जिल्हा परिषदेकडून जनजागृती करण्यात येत होती, त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. एकूणच या सर्व उपाययोजनांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
157 ग्रामपंचायतींमधून कोरोना हद्दपार 172 गावात एकही मृत्यू नाही
ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १० हजार ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना मृत्यूंच्या आकड्यांचा फेरआढावा घेऊन, मृतांची यादी अद्ययावत करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये मृतांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. परंतु ठाणे जिल्ह्यातील १७२ गावांमध्ये अद्याप एकही रुग्ण कोरोनामुळे दगावला नसल्याची सकारात्मक बाब या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना लसीकरणाचे आवाहन
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामस्थांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत गावाची काळजी घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे यांनी चाचणी, संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि रुग्णांवर वेळेत उपचार या आखून दिलेल्या त्रिसूत्रीचे ग्रामस्थांनी आणि स्थानिक प्रशासनाने योग्यरीत्या पालन केले. त्यामुळे कोरोनाला हरवण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. दरम्यान आता नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही वाचा -अदर पूनावाला पुण्यात परतले, मोठ्या नेत्यांकडून धमक्या मिळत असल्याने सोडला होता देश