ठाणे- सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन ही खूप चांगली कल्पना आहे. त्यामुळे कुटुंबावर पडणारे मोठे खर्चाचे ओझे दूर करता येईल. आज विवाह होणाऱ्या आदिवासी जोडप्यांच्या परिवारात आम्हीही नातेवाईक म्हणून सहभागी होऊ शकलो. त्यांना माझे खूप आशीर्वाद, अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ हजार १०१ जोडप्यांना शुभेच्छा दिल्या.
खासदार कपिल पाटील फाऊंडेशन व हिंदू सेवा संघ (महाराष्ट्र) यांच्या सहयोगातून आसनगाव येथे १ हजार १०१ आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा आज पार पडला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहून आदिवासी जोडप्यांना शुभाशिर्वाद दिल्यामुळे नवविवाहित जोडप्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झालेला दिसत होता.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार कपिल पाटील, दिंडोरीचे खासदार हरिशचंद्र चव्हाण, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, हिंदू सेवा संघाचे काका जगे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
सामूहिक विवाहसोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री बोलताना आपल्या भाषणात पुलवामा हल्ल्याचा निषेध करून आपला देश या भ्याड कृत्याचा निश्चित बदला घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितले. सामूहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम अधिकाधिक व्हावला हवे. आदिवासी समाजाने जल, जमीन, जंगल खऱ्या अर्थाने टिकविले. आपल्या संस्कृतीचे रक्षण केले. वधु-वरांना आपल्या आयुष्यातील विवाहाच्या या मंगलप्रसंगाची खूप उत्सुकता आहे. त्यामुळे मी आज फार भाषण करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विवाह सोहळा सुरू झाल्यावर मुख्यमंत्री आणि व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी विवाह सोहळ्यातील जोडप्यांवर मंगलाष्टका वाहिल्या व सर्वांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ५ जोडप्यांना मंगळसूत्र, प्रधानमंत्री उजवला योजनेत गॅस तसेच जिंदाल कंपनीतर्फे संसारोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले.