ठाणे : मिळालेल्या माहितीनुसार जबरदास वैष्णव यांचे डोंबिवली पश्चिम भागातील चिंचोड्याचा पाडा परिसरात श्री बालाजी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. तर याच भागातील कर्वे रस्त्यावर भागशाळा मैदान भागात राहणाऱ्या नारायण रायकर यांचे रायकर ज्वेलर्स आहे. दोन्ही दुकाने वर्दळीच्या रस्त्यावर आहेत. चोरट्यांनी आज (गुरुवारी ) पहाटे तीन ते पाच वाजताच्या सुमारास दुकानांचे शटर फोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर १३ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने लुटून पोबारा केला. विशेष म्हणजे आपली ओळख पोलिसांना पटू नये म्हणून चोरट्यांनी सराफांच्या दुकानातील सीसीटीव्ही, डीव्हीआर चोरट्याने पळवला आहे.
चोरीविषयी आश्चर्य :दुकान मालक जबरदास वैष्णव, नारायण रायकर हे नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री दहा वाजता दुकान बंद करुन घरी गेले. दरम्यानच्या काळात पहाटेच्या वेळेत चोरट्यांनी दुकानाची मुख्य प्रवेशद्वारे लोखंडी कटावणीने फोडून आतील लोखंडी जाळ्या तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील ऐवज, सव्वा लाखाची रोख रक्कम लुटून पलायन केले. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दुकाने आहेत. रिक्षा, पादचाऱ्यांची पहाटे वर्दळ असते. अशा परिस्थितीत चोरट्यांनी या भागात चोरीचे धाडस केल्याने दुकानदारांनी आश्चर्य व्यक्त केले.