ठाणे- महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे चोरट्यांची दिवाळी साजरी झाली. तर दिपावलीच्या सणासुदीत चोरी झाल्याने व्यावसायिकांचे दिवाळे निघाल्याची घटना घडली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील खर्डी बाजारापेठ परिसरात घडली. या घटनेनंतर खर्डीच्या व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
वीजपुरवठा खंडितमुळे चोरट्यांची दिवाळी; एकाच रात्री फोडली ३ दुकाने
महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे चोरट्यांची दिवाळी साजरी झाली. शहापूर तालुक्यातील खर्डी बाजारपेठ येथील तीन दुकाने चोरट्यांनी फोडल्याने ऐन दिवाळी व्यापाऱ्यांचे दिवाळे निघाले आहे.
शहापूर तालुक्यातील खर्डी बाजारापेठ परिसरात काल रात्री अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने येथील नागरिकांनी वांरवार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. मात्र, महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडीतच राहिला. त्यामुळे अंधाराचा फायदा घेत, चोरट्यांनी बाजारपेठ परिसरातील ३ दुकानांचे कुलूप फोडून दुकानातील रोकडसह हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. खर्डी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचानाम करीत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. मात्र, या घटनेनंतर खर्डीच्या व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.