ठाणे - कोरोनामुळे गेल्या दोन वर्षाच्या खंडानंतर बुधवारी शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र अंबरनाथ शहरातील एका शाळेचे दार उघडल्यानंतर अजब चोरीचा प्रकार समोर आला. यामध्ये चोरटयांनी शाळेची घंटा, वर्गातील पंखे, पाण्याची मोटार, पाण्याचे मीटर, दिवे असा तब्बल आठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी सुट्टीच्या काळात लंपास केला. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
Theft In School : दोन वर्षानंतर उघडले शाळेचे दार, चोरट्याने घंटा, पंखे मिटर अन् लाईटही लंपास केल्याचे आले समोर - चोरट्याने लांबवला शाळेतील घंटा
अंबरनाथ शहरातील एका शाळेचे दार उघडल्यानंतर अजब चोरीचा प्रकार समोर आला. यामध्ये चोरटयांनी शाळेची घंटा, वर्गातील पंखे, पाण्याची मोटार, पाण्याचे मीटर, दिवे असा तब्बल आठ हजार रुपयांचा मुद्देमाल सुट्टीच्या काळात लंपास केला.
राष्ट्रीय हिंदी विद्यालयातील घटना - अंबरनाथ पश्चिम येथील भेंडीपाडा परिसरात राष्ट्रीय हिंदी विद्यालय नावाची शाळा आहे. या शाळेत आठवड्याभरापूर्वी शाळेच्या सहशिक्षिका शाळेची पाहणी करण्यासाठी आले असता शाळेत चोरी झाल्याचे समोर आले. त्यानंतर शाळेच्या संस्थेला माहिती दिल्यानंतर मंगळवारी शाळेचे सह शिक्षक राजेश पांडे यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात शाळेत चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी झालेल्या मुद्देमालात शाळेची पितळेची घंटा, नऊ पंखे, पाण्याची मोटर, पाण्याचे मीटर, दिवे, गणित आणि विज्ञानाचे प्रयोग पेटी या साहित्याचा समावेश आहे.
पहिली हिंदीभाषिक शाळा -ठाणे जिल्ह्यातील हिंदी सेवा मंडळाच्या अखत्यारीत असलेली अंबरनाथ पश्चिम येथील भेंडीपाडा परिसरातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयाची सुरुवात १९५९ साली झाली. अंबरनाथ शहरातील ही पहिली हिंदीभाषिक शाळा होती. तेव्हापासून आजतागायत पहिली ते सातवी शिक्षण या शाळेतर्फे देण्यात येते. या शाळेचा परिसर झोपडपट्टीचा आहे. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय मजूर, कामगारांची मुले या शाळेत शिकतात. या शाळेचा सध्याचा पट १३५ मुलांचा आहे.