ठाणे- कोरोनाकाळात मराठी कलाकार, लोक कलावंत, नाट्यकर्मी यांचं मोठं नुकसान झालं असुन अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एक कलाकार म्हणून हि खुप मोठी शोकांतिका आहे. नाट्यगृह आणि चित्रपटगृह लवकरात लवकर सुरु व्हावे मात्र कोरोनाकाळात बंद खोलीत एकत्रित येण धोक्याचे असल्याने ते अद्यापही सुरु करण्यासाठी वेळ लागतोय. पण लवकरच ते देखील सुरु करण्याचा निर्णय येणार असल्याचे अभिनेत्री आणि शिवसेना महिला उपनेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले.
ठाण्यात विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित मंगळा गौर कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर या उपस्थित झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी लोकनृत्यावर ठेका धरला. यावेळी शिवसेना नगरसेविका परिषा सरनाईक या देखील होत्या. आदिवासी नृत्यावर ठेका धरल्यानंतर उपस्थितांसाठी त्यांनी यावेळी लावणीच्या दोन ओळी देखील गाऊन सर्वांची मन जिंकली.