ठाणे - उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात एका महिलेवर यशस्वी इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट केल्यानंतर त्या महिलेने ३ मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या महिलेने अनेक खासगी रुग्णालयात उपचार करून बघितले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर मध्यवर्ती रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तृप्ती रोकडे यांच्या मार्गदर्शनाद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
गर्भाशयाच्या गंभीर समस्येमुळे होत नव्हते मूलबाळ
उल्हासनगर कॅम्प नंबर ५ परिसरात राहणाऱ्या निशिता खुशलानी (वय २६ वर्षे) यांचे दोन वर्षांपूर्वी हितेश खुशलानीसोबत विवाह झाला होता. त्यांनतर निशिताला गर्भाशयाची गंभीर समस्या असल्यामुळे मूलबाळ होत नव्हते. यासाठी खुशलानी दाम्पत्याने अनेक खासगी रुग्णालयात महागडे उपचार करून बघितले. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. शेवटी खुशलानी दाम्पत्याने अखेरचा उपाय म्हणून मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. मध्यवर्ती रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तृप्ती रोकडे यांनी निशिताची वैद्यकीय तपासणी केली आणि तिच्यावर आतापर्यंत झालेल्या उपचारांची माहिती घेतली. निशिता डॉ. तृप्ती यांच्याकडे उपचार घेत आहे. नियमितपणे वैद्यकीय तपासणी व औषधोपचार सुरू झाल्यानंतर निशितावर इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट सुरू झाली या उपचारानंतर आज निशिताने तीन मुलांना जन्म दिला.
गर्भाशयात फायब्रॉईडची गाठ
निशिता ही डिसेंबर, २०२० पासून मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत होती. तिच्या विविध वैद्यकीय तपासण्या घेतल्या असता तिच्या गर्भाशयात फायब्रॉईडची गाठ असल्याचे आढळून आले. या गाठी हॉर्मोन्सच्या बदलामुळे होतात. ही गाठ आम्ही शस्त्रक्रिया करुन यशस्वीरित्या काढून टाकली. त्यानंतर तिला गर्भ धारणा झाली आणि तिने तिळ्यांना जन्म दिला. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. जाफर तडवी, डॉ. सिंग, डॉ. मोनाळकर आणि सर्व पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली, अशी माहिती डॉ. तृप्ती रोकडे यांनी दिली आहे.