ठाणे -दिवा शहराजवळील खर्डी गाव येथील खाडीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी मिळून आला होता. एका पत्र्याच्या पेटीत हा मृतदेह आढळून आल्याने हा घातपाताचा प्रकार असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. दरम्यान, या घटनेचा उलगडा करण्यात डायघर पोलिसांना यश आले आहे. सदर खून सख्या बहीण भावांनी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोघांना डायघर पोलिसांनी गजाआड केले आहे.
ठाणे; डायघर भागात पेटीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
एका पत्र्याच्या पेटीत प्लास्टिक कागदात बांधलेल्या स्थितीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
व्यक्तीची हत्या करून मृतदेहाची व्हिल्हेवाट
गुरुवारी सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास खर्डी गाव, दिवा-शिळफाटा रोड, दिवा याठिकाणी दिवा खाडी किनारी एका लोखंडी पत्राच्या पेटीमधून दुर्गंध येत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी ठाणे अग्निशमन केंद्रामध्ये दिली होती. घटनेनंतर अग्निशमन दल, मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एका पत्र्याच्या पेटीत प्लास्टिक कागदात बांधलेल्या स्थितीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. सदर व्यक्तीचे वय अंदाजे 35 वर्ष इतके होते. या व्यक्तीची हत्या करून मृतदेहाची कुणीतरी व्हिल्हेवाट लावली असावी, असा संशय पोलिसांना होता.
पेटीच्या तपासात मिळाले धागेदोरे
त्यानुसार डायघर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेत मृतदेह आढळले ती पत्र्याची पेटी सोडली तर कुठलाही पुरावा नव्हता. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारच्या पेटी बनवणाऱ्याचा शोध घेतला असता ही पेटी धारावी मुंबई येथून बनवली असल्याचे समोर आले. पोलिसांनी पेटी बनवणाऱ्या व्यक्तीकडे तपास केला असता ही पेटी 30 मार्च रोजी एका महिलेने खरेदी केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या महिलेचा शोध घेऊन तिला घणसोली नवी मुंबई येथून अटक केली. अनिता संजय यादव असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेकडे अधिक चौकशी केली असता तिने आपला प्रियकर मनीष यादव याचा खून भावाच्या मदतीने केला व त्यानंतर त्याचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत टाकून खाडीत फेकून दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी महिलेचा भाऊ विजय पिसू भिल्लारे यास देखील अटक केली आहे.