ठाणे -मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली बायपास नाका येथील उड्डाणपुलाच्या डाव्या मार्गिकेवर ५० मीटर लांबीचे लोखंडी गर्डर एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे टाकण्यात आले. येत्या दोन महिन्यात या उड्डाण पुलाच्या डाव्या मार्गिकेवरूनही वाहनांची ये-जा सुरू होणार आहे. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर दररोज जीवघेणी वाहतूककोंडी होत आहे. या वाहतूक कोंडी विरोधात नागरिकांमधून ओरड वाढल्याने राज्य शासनाने एमएमआरडीए प्रशासनाकडून मागील आठ वर्षांपूर्वी भिवंडी तालुक्यातील माणकोली नाका, रांजणोली बायपास नाका आदी ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र येथील दोन्ही बायपास उड्डाण पुलाच्या ठेकेदार कंपनीने हलगर्जीपणा केल्यामुळे उड्डाण पुलाचे बांधकाम रखडले होते. त्याची दखल राज्य सरकारने घेऊन चार महिन्यांपूर्वी नवीन ठेकेदार कंपनी नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एमएमआरडीए प्रशासनाने बांधकाम क्षेत्रातील आर.पी.एस.इन्फ्रा.प्रोजेक्ट प्रा.लि.या बांधकाम कंपनीची नियुक्ती करून सल्लागार म्हणून टेक्नॉजेम कन्सल्टंट यांची नियुक्ती केली आहे. वाहतूक कोंडीतून वाहन चालक व नागरिकांची सुटका करण्यासाठी कंपनी प्रशासनाने सुरक्षिततेचे मापदंड लक्षात घेऊन अवघ्या दोन महिन्यातच डाव्या मार्गिकेवर ५० मीटर लांब व १७ मीटर रुंदीचे सहा लोखंडी गर्डर टाकण्यात यश मिळवले आहे.