महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rickshaw Pullers :आश्वासनांची झाली शंभरी परंतु मागण्या पूर्ण न झाल्याने रिक्षाचालक मुख्यमंत्र्यांवर नाराज, लवकरच रिक्षा बंदची हाक? - Chief Minister Eknath Shinde

रिक्षा चालकांनी (Rickshaw Pullers) रिक्षा बंदच्या हाकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या आश्वासनानंतर स्थगिती दिली. मात्र अद्याप एकही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अखेर आश्वासनाच्या मुदतीची शंभरी ओलांडल्यानंतर आता पुन्हा "रिक्षा बंद" ची हाक देण्याच्या मनस्थितीत रिक्षा संघटना असल्याची माहिती समोर येत आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 28, 2022, 10:59 PM IST

ठाणे : वाढती महागाई, मोकाट सोडलेले रिक्षा परमिट, पेट्रोलच्या बरोबरीने गाठत असलेला सीएनजीचा दर, रिक्षांचा बसलेला धंदा, वाहतूक कोंडी, स्टँडची उणीव, पार्किंगची समस्या, वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई अशा विविध समस्यांच्या विळख्यात असलेल्या रिक्षा चालकांनी (Rickshaw Pullers) रिक्षा बंदच्या हाकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या आश्वासनानंतर स्थगिती दिली. मात्र अद्याप एकही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अखेर आश्वासनाच्या मुदतीची शंभरी ओलांडल्यानंतर आता पुन्हा "रिक्षा बंद" ची हाक देण्याच्या मनस्थितीत रिक्षा संघटना असल्याची माहिती समोर येत आहे.

रिक्षा बंदची हाक? - ठाणे शहरात २५ हजार पेक्षा जास्त रिक्षा रस्त्यावर धावतात. या रिक्षा चालकांच्या अनेक समस्या आहेत. त्याचा साधा विचारही केला जात नाही. समस्या सुटाव्या यासाठी रिक्षा चालक संघटनांनी मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र कुठलीच दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर रिक्षा चालक संघटनेने "रिक्षा बंद" ची हाक दिली. तेव्हा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तीन महिन्याच्या मुदतीत मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. रिक्षा संघटनांनी मंत्री महोदयांचा सन्मान ठेवत रिक्षा बंद आंदोलनाला स्थगिती दिली. आता काही आठवड्यानंतर मंत्री उदय सामंत यांची मुदत संपेल मात्र एकही मागणी मान्य न झाल्याने आता दोन दिवसानंतर कोणत्याही क्षणी, कोणतीही पुर्व कल्पना न देता "रिक्षा बंद" ची हाक देण्यात येणार असल्याची माहिती रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेने दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही -सीएनजीचे दर हे दिवसेंदिवस वाढतच आहेत. जवळपास 90 रुपये प्रतिकिलो सीएनजीचा दर आहे. एकतर सीएनजीचे दर कमी करा किंवा रिक्षांचे मीटर वाढवा अशी मागणी होती. रिक्षांचा मीटर हा 25 रुपये करावा मात्र मीटर 23 एवढाच ठेवण्यात आला. त्यामुळे रिक्षा चालकांना नुकसान होत आहे. पूर्वीच रिक्षा व्यवसाय धोक्यात आला असतानाच नुकसानीचा धंदा करण्याची नामुष्की रिक्षाचालकांवर ओढवलेली आहे. तसेच हजारो रिक्षा चालकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा रिक्षावर आधारित आहे. त्यात रिक्षा चालविल्यानंतरही विविध समस्यांमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ ओढवते आहे. म्हणून रिक्षा चालकांना आणि रिक्षा व्यवसायिकांना दिलासा मिळावा यासाठी रिक्षा चालकांचे महामंडळ बनविण्याची प्रमुख मागणी होती त्यावर आश्वासन दिले मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. आम्ही केवळ मुदतीची वाट पाहत होतो, आता मुदत संपणार आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनाची पूर्ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी आमच्या अपेक्षांना पान पुसल्याची भावना रिक्षा संघटना करत आहेत.



रिक्षाचालकांना अनेक समस्या - वाढलेले सीएनजी दर त्यात रोज येणाऱ्या नवीन रिक्षा, यामुळे रिक्षाचालक हा दिवसेंदिवस असुरक्षित होत आहे. मीटरचीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांच नुकसान होते आहे. दिवसभर रिक्षा चालून रिक्षाच्या बँकेचा हप्ता, इंधन आणि स्वतःची मेहनत निघणे मुश्किल झाले आहे. पार्किंग, स्टँडची व्यवस्था नाही. त्यात वाहतूक पोलीस मोबाईलवर फोटो काढून दंडात्मक कारवाई करतात. पूर्वीच तोट्यात असलेला रिक्षाचालक, दंड भरून उध्वस्त होत आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत रिक्षा चालक संघटनेचे आहे.



रिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्या - रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे. ठाण्यात प्रवाशांच्या आणि चालकांच्या सोयीने रिक्षा स्टॅन्ड निर्माण करावे तसेच ठाण्यात रिक्षांची पार्किंगची व्यवस्था करावी. इंधनाचे दर कमी करावे किंवा रिक्षाचा मीटर २३ वरून २६ रुपये करावे तसेच रिक्षा चालकांच्या मागचा वाहतूक पोलिसांचा जाचक ससेमिरा थांबवण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details