नवी मुंबई -पनवेलमधील मोरबे गावाजवळील धरणात बुधवारी (दि. 16 सप्टें.) एका महिलेचा मृतदेह तार व दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळला होता. मृतदेह पाण्यात तळापर्यंत जायला हवा, या उद्देशाने शरीराला सिमेंटचे ब्लॉकही बांधलेले होते. आता तिच्या मृत्यूचे गूढ उकलले असून, याप्रकरणी महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या व्यक्तीसह त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
पनवेल तालुक्यातील मोरेबे धरणात बुधवारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. महिलेचा मृतदेह डोक्यापासून ते गुडघ्यापर्यंत तारांनी घट्ट बांधलेला होता. तसेच सिमेंटचे ब्लॉकही बांधले होते. मृतदेह धरणातील पाण्याच्या तळापर्यंत जाण्याच्या उद्देशाने मारेकऱ्यांनी शरीरावर सिमेंटचे ब्लॉक बांधले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मृतदेहाला ज्या तारांनी बांधलेले होते, त्या तारा काढण्यासाठी जवळपास 45 मिनिटे लागली. महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने ओळख पटवण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील बेपत्ता झालेल्या लोकांची माहिती घेत या प्रकरणी हत्येचा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.