माहिती देताना अधिकारी आणि नागरिक ठाणे :कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सरोवर (शेनाळे तलाव) सुशोभिकरण, मलशुद्धीकरण केंद्र आंबिवली, मलशुध्दीकरण केंद्र वाडेघर (कल्याण प.) व बी. एस. यु. पी. अंतर्गत बांधलेल्या सदनिकांचे प्रकल्प बाधितांना वाटप आदी विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा बुधवारी सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पाडला. मात्र, या कार्यक्रमानंतर काही वेळानंतर प्रबोधनकार ठाकरे सरोवरचे मुख्यप्रवेश दार तुटून पडले आहे. त्यावरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
एमएमआरला सर्व सुविधा मिळायला हव्यात : यशवंतराव चव्हाण मैदानात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कल्याणमधील प्रबोधनकार ठाकरे सरोवर भगवा तलाव हा ऐतिहासिक आहे. या ठिकाणी ज्या सुविधा करता येतील त्या करावेत. कल्याण एक ऐतिहासिक शहर आहे. मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवरचा कल्याण डोंबिवली हा सगळा परिसर आता वाढत आहे. मुंबईतले लोक ठाण्याकडे आणि ठाण्यातले लोक कल्याण डोंबिवली मध्ये येत आहेत. येथील लोकांसाठी परवडणारी घर मिळाली पाहिजे. घर हे प्रत्येकाचं स्वप्न असते आणि म्हणून ते देण्याचे काम आज कल्याण डोंबिवलीमध्ये झालं आहे. मुंबई ठाण्यासारख्या मोठ्या शहरांप्रमाणे कल्याण डोंबिवलीसह एमएमआरला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित : या लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, गणपत गायकवाड, विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. भाऊसाहेब दांगडे आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, प्रबोधनकार ठाकरे तलाव उर्फ भगवा तलाव (काळा तलाव) कोटयवधीचा निधी खर्च करून स्मार्ट सिटीच्या योजनेतून नूतनीकरण करणारे कार्यकारी अभियंता प्रल्हाद रोडे यांच्याकडे मुख्यप्रवेश दार तुटल्या बाबत विचारणा केली असता, मुख्यमंत्री ज्यावेळी तलाव परिसरात आले होते. त्यावेळी मोठ्या संख्यने नागरिकांनी झुंबड उडाली होती.
निधी वायफळ खर्च झाला नाही : ही नागरिकांची झुंबड आवरणे पोलिसांच्या अवाक्या बाहेर गेल्याने गर्दीच्या रेट्यामुळे गेट निखळून पडल्याचे त्यांनी सांगतले. तसेच, कामाचा दर्जा उत्तम पणे राखला असून त्याचा तपासणी अहवालही आमच्याकडे असल्याचे त्यांनी सांगत पुन्हा गेट उभारण्याचे काम सुरू केले आहे. तर शंकर साळवे या नागरिकाने तर लोखंडी गेट उभारणीसाठी वापरले लोखंड गंजलेल्या अवस्थेत असल्यानेच गेट तुटून पडले. त्यामुळे महापालिका प्रशासन करीत असलेल्या विकासकामांच्या दर्जाबाबात सवाल उपस्थित करून लाखोंचा निधी वायफळ खर्च होत असल्याचे मत व्यक्त केले.
हेही वाचा :साई भक्तांसाठी खुशखबर! शिर्डी विमानतळाला ‘नाईट लँडिंग’ परवाना मिळाला