ठाणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळत असलेला अत्यल्प दर, वनजमिनींचा प्रश्न, गॅस दरवाढ यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातून रविवारी लॉग मोर्चाला किसान सभेचे नेते अजित नवले , माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. आज चौथ्या दिवशीही हजारो कष्टकरी, शेतकरी, आदिवासी बांधव मोर्चात सहभागी होऊन उन्ह, पाऊस अंगावर झेलत मुबंईच्या दिशेनं हे लाल वादळ घोंगावत पुढे जात आहे. दरम्यान २३ मार्च रोजी मुंबईतील विधान भवनावर लाल वादळ आपल्या मागण्यासह धडकणार असल्याने ठाणे व मुंबई शहरातील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
हजरो शेतकऱ्यांच्या हातात लाल बावटा : हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थित लाल वादळाने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील जुना कसारा घाटात प्रवेश केला. यावेळी जुना कसारा घाटातील वाहतूक नवीन कसारा घाट मार्गावर वळविण्यात आली आहे. या लॉग मोर्चात हजरो शेतकरी, कष्टकरी, महिला, वृद्ध इतकंच काय तर लहान मुलांचे चिमुकले पायी कसारा घाटातील रस्ता तुडवत मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. हजरो शेतकऱ्यांच्या हातात लाल बावटा घेतल्यामुळे जुना कसारा घाटातील रस्तेच्या रस्ते लालभडक दिसत आहेत.