नवी मुंबई -नवी मुंबई पाम बीच रोडवर झालेल्या हिट अँड रन प्रकरणात दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूप्रकरणी गमरे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ते न्याय मागत आहेत.
काय आहे प्रकरण?
पाम बीच रोडवर एका कारने रात्री दीडच्या दरम्यान बाइकवरून जाणाऱ्या संकेत गमरे व अक्षय गमरे या दोन सख्ख्या भावांना उडवले होते. अपघात झाल्यानंतर चालक रोहन ॲबोट (३२) कार सोडून घटनास्थळावरून पळून गेला होता. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात चालकाच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला. त्यानंतर पोलिसांनी कारचालक रोहन ॲबोटला अटकदेखील केली. मात्र त्यानंतर त्याला जागेवरच जामीनही मिळाला.
पोलीसच न्यायाच्या प्रतीक्षेत
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांचे वडील अनिल गमरे हे गेली 28 वर्ष मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलिसांना जर न्याय मिळत नसेल तर इतरांचे काय? असा आर्त सवाल गमरे कुटुंबातील लोकांनी केला आहे. तसेच न्यायासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही साकडे घातले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
'आम्हाला न्याय द्या'
एकाचवेळी दोन मुलांना गमावल्यामुळे संकेत आणि अनिल यांच्या आई मालती यांनी अति दुःखाने आर्त टाहो फोडला आहे. माझ्या मुलांचा अपघात करून, पळून जाणाऱ्याला फाशी द्या, आम्हाला न्याय द्या, अशी मागणीही त्या मातेने केली आहे. तर गृहमंत्र्यांनी यासंबंधी चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.