ठाणे - शेतकरी, कामगार वर्गाच्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभेचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाला आहे. या लाँग मार्चमध्ये पंधरा हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले असून, शेतकऱ्यांचे लाल वादळ ठाणे जिल्ह्याच्या वेशीवर धडकले आहे. अखिल भारतीय किसान सभेचा लाँगमार्च रविवारी दुपारी हा शहापूर तालुक्यात दाखल झाला आहे.
लाँग मार्चमध्ये 15 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
अखिल भारतीय किसान सभेच्या लाॅंग मार्चमध्ये सहभागी झालेले शेतकरी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जीप, ट्रॅक्टर अशा आपल्या वाहनांसोबत या मोर्चामध्ये 15 हजारांपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. २६ जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला आहे.
“लाल वादळ” ठाण्याच्या वेशीवर मोर्चा आझाद मैदानावर धडकला
नाशिकच्या ईदगाह मैदानापासून निघालेला किसान सभेचा हा मोर्चा आज (२४ जानेवारी) मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणार असून, हे लाल वादळ नाशिक, कसारा घाटामार्गे शहापूर, भिवंडी तालुक्यातून मुंबईत दाखल झाले. या मोर्चासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती किसान सभेच्यावतीने देण्यात आली आहे.