ठाणे - दीड वर्षाच्या चिमुरडीला चुकीच्या पद्धतीने औषधे देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघा दोन डॉक्टरांविरोधात कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. डॉ. मोहंमद ताज अन्सारी (वय 45 वर्षे), डॉ. एस. एम. आलम (वय 45 वर्षे), असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे असून यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. मात्र, 6 महिन्यांपूर्वी चिमुरडीचा मृत्यू नेमका कशामुळे यासाठी दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या परवानगीने तिचा दफन केलेला मृतदेह तपासणीसाठी बाहेर काढून फॉरेन्सिक लॅबकडे ( Forensic Lab ) रवाना केला आहे.
उपचार सुरू असतानाच चिमुरडीचा मृत्यू -कल्याण पूर्वेतील गोविंदवाडी परिसरात मुन्नी सहानी या कुटूंबासह राहतात. तर याच भागात गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांचे हसन क्लिनिक, नावाने छोटेसे क्लिनिक आहे. मुन्नी सहानी यांची लहान मुलगी नेहा आजारी असल्याने 5 जुलै, 2021 रोजी हसन क्लिनिकमध्ये दुपारच्या सुमारास मुलीला घेऊन उपचारासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तिची तपासणी करून डॉक्टर मोहंमद अन्सारी यांनी डॉ. आलम यांच्या लेटरहेडवर नेहाला औषधे लिहून देत ती औषधे चिमुरडीला देण्यास तिच्या आईला सांगितले. मात्र, त्या औषधांचे सेवन केल्याने नेहाची प्रकृती अधिक गंभीर झाली होती. त्यामुळे पुन्हा 6 जुलै रोजी नेहाची आईला तिला पुन्हा हसन क्लिनिकमधील डॉक्टराकडे घेऊन गेली. मात्र, त्याच दिवशी सांयकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाला होता.
न्यायासाठी पोलीस ठाण्यानंतर न्यायालयात धाव -मृत नेहाच्या आईने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगत डॉक्टरवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी पोलिसांनी कुठली कारवाई केली नसल्याचे दिसून आल्याने मृताच्या आईने कल्याण न्यायालयात अर्ज सादर करून आरोपी डॉक्टरा विरोधात कारवाईची मागणी केली होती. यावरून न्यायालयाने संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 9 डिसेंबर, 2012 रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही डॉक्टरांविरोधात भा.द.वी.चे कलम ३०४, ४०६, ३४ सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 33 (2), 33 (अ ) 36 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
न्यायालयाच्या आदेशाने काढला मृतदेह बाहेर -न्यायालयाच्या आदेशाने डिसेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी दोघांना अटकही केली. मात्र, काही दिवसांपूर्वीच डॉक्टरसह त्याच्या साथीदाराला न्यायालयाने जमीन मंजूर केला. त्यातच न्यायालयाकडे मुलीचा मृतदेह बाहेर काढून त्याची तपासणी केली जावी, अशी मागणी तिच्या पालकांनी केली होती. त्यांनतर न्यायालयाच्या आदेशानंतर 3 जानेवारी, 2022 रोजी नायब तहसीलदार सुषमा बांगर यांच्या उपस्थित पोलीस आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी चिमुरडीचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढला. आता मृतदेहाच्या सांगाड्याचे सॅम्पल घेऊन मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला पाठविला आहेत. फॉरेन्सीक लॅबचा अहवालातून मुलीच्या मृत्यूचे कारण बाहेर येऊ शकते, असे मृत मुलींच्या पालकांनी सांगितले.
हेही वाचा -Truck Crash in Kasara Ghat : मोठा अनर्थ टळला; कसारा घाटात ट्रक दरीत कोसळला, सुदैवाने रेल्वे थोडक्यात बचावली