ठाणे -दुचाकी असो किंवा चारचाकी वाहनाच्या खरेदीनंतर आपल्याला हवा असलेला गाडी क्रमांक पाहिजे असेल, तर प्रादेशिक परिवहन कार्यालयात पसंतीच्या क्रमांकासाठी काही रक्कम भरून तो क्रमांक मिळवता येतो. त्यानुसार ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात खरेदी केलेल्या वाहनांसाठी पसंतीचा क्रमांक घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली आहे. मार्च 2020 ते 30 एप्रिल 2021 या एक वर्षाच्या कालावधीत तब्बल पसंतीच्या क्रमांकासाठी 17 कोटी 13 लाख 55 हजार 500चा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला. ग्राहकांना वाहनाच्या नंबरची मोठी क्रेज आहे. त्यामुळे अनेक ग्राहक पसंतीचे नंबर मिळवण्यासाठी शासनाने निर्धारित केलेली रक्कम भरून तो नंबर खरेदी करतात.
पसंतीच्या क्रमांकासाठी एक महिन्याचा कालावधी -
दुचाकी आणि चारचाकी खरेदी केल्यानंतर पसंतीच्या क्रमांकासाठी निवेदन करताच शासनाने निर्धारित केलेली रक्कम परिवहन कार्यालयात जमा केल्यानंतर त्या वाहनाला तो नंबर मिळतो. हवा असलेल्या नंबरची मागणी केल्यानंतर एका महिन्याच्या आत तो नंबर ग्राहकाने अथवा वाहन मालकाने घेणे गरजेचे आहे. अन्यथा नंबर दुसऱ्याला दिला जातो. या पसंतीच्या क्रमांकावरून अनेक ग्राहक आपले नाव किंवा फॅन्सी नंबर गाड्यांवर लावतात. जसे '4141' या क्रमांकावरून फॅन्सी नंबरप्लेट 'दादा' तयार होते. '2117' या नंबरची फॅन्सी नंबरपेल्ट ही 'राम' तयार होते. तर 'राज' ही फॅन्सी प्लेट बनविणायसाठी परिवहन कार्यालयाकडे ग्राहक '2151' या नंबरची मागणी करतात. जर एकाच नंबरसाठी एका पेक्षा जास्त मागणी अर्ज आल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय हे या नंबरसाठी लिलाव करतात. त्यानंतर जो ग्राहक जास्त रक्कम भरेल, त्याला तो नंबर दिला जातो.