ठाणे : कुलकर्णी हे चित्रकार असताना, पेन्शन देताना समाज कल्याण विभागाने त्यांची नोंद चक्क चोपदार अशी करून पेन्शन कपात केली असल्याचे, स्वतः कुलकर्णी यांनी सांगितले. याबाबत वारंवार पाठपुरावा करून उपकाराची भाषा करून अधिकारी वर्ग त्यांची अवहेलना करीत आहे. तेव्हा, मुख्यमंत्र्यांनी या ठाणेकर कलाकाराला न्याय देण्याची मागणी जोर धरीत आहे. या सरकारी चुकीमुळे ठाण्यातील ख्यातनाम वयोवृद्ध चित्रकार सदाशिव कुलकर्णी यांच्या शासन दरबारी फेऱ्या सुरु आहेत.
चित्रकार ऐवजी चोपदार अशी केली नोंद: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले ठाण्यातील वयोवृद्ध चित्रकार सदाशिव कुलकर्णी (६६) यांनी पेन्शनसाठी शासनाकडे चित्रकार म्हणून अर्ज केला होता. चित्रकार असल्याचे सिद्ध करणारी जवळपास शेकडो शिफारसपत्रे त्यांनी या अर्जासोबत जोडली होती. यात ठाणे शहरातील आमदार काही नामवंत संस्था आणि प्रसिद्ध कलाकारांच्या शिफारसपत्रांचा समावेश होता. या सर्व शिफारसपत्रांवर आणि अर्जात सदाशिव कुलकर्णी यांचा चित्रकार म्हणूनच उल्लेख होता. मध्यंतरी कोरोना काळात सर्वच ठप्प असल्याने बऱ्याच काळानंतर हा अर्ज मंजुर झाला. मात्र, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समाज कल्याण विभागाने चुकीने त्यांची नोंद 'चित्रकार' ऐवजी 'चोपदार' अशी केली. शासनाच्या पेन्शन योजनेत चित्रकारांचा समावेश गट-अ मध्ये, तर चोपदाराचा समावेश गट-क मध्ये होतो. त्यामुळे कुलकर्णी यांना गट-क प्रमाणे ३,७०० रुपयांऐवजी २,२०० रुपये पेन्शन मिळत आहे. यामुळे कुलकर्णी यांचे मागील चार वर्षापासून आर्थिक नुकसान होत आहे.