ठाणे : आपल्या सात वर्षांच्या मुलीची चाकूने गळा कापत हत्या करुन, आईने पुढे स्वतःचाही गळा चिरून घेतल्याची खळबळजनक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. मिनाबाई अशोक पाटील (३०) असे या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती पोलीस आहेत. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर (पूर्व) येथील शिरगाव परिसरातील शुभमकरोती कॉम्प्लेक्स बिल्डिंग क्रं ४/३०३ मध्ये, गुरुवारी रात्री ही घटना घडली. मिनाबाई यांचे पती मुंबई पोलिस दलात कामाला असुन, रात्री ११.३० च्या सुमारास मिनाबाई या घरातील बेडरूममध्ये झोपल्या होत्या. तर घरातील हॉलमध्ये त्यांच्या सासू केवडबाई पाटील (६४) या नात किर्तीका (७) हिच्यासोबत झोपल्या होत्या. काही वेळानंतर मीनाबाई या हॉलमध्ये आल्या, आणि त्यांनी किर्तीकाला बेडरूममध्ये झोपायला नेले.
काही वेळाने किर्तीका हिचा ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज आल्याने, केवडबाई झोपेतुन जाग्या झाल्या. त्यांनी बेडरूममध्ये डोकाऊन पाहिले असता, त्याठिकाणी मायलेकी रक्ताच्या थारोळयात पडल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच, बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डी. व्ही. देशमुख, सहाय्यक पोलीस निरिक्षक एच.एम. कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली.