ठाणे : मध्य रेल्वेच्या सेवेतील सहायक लोको पायलटने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा लोको पायलट कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात राहत होता. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुजीत कुमार जयंत (वय ४८) असे आत्महत्या करणाऱ्या लोको पायलटचे नाव आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी : मिळलेल्या माहितीनुसार, मृत सुजीत हे मुळचे उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंब मूळ गावी आहे. त्यातच मृत सुजीत राहत असलेल्या घराचा दरवाजा १४ ऑगस्टपासून उघडला जात नव्हता. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर रविवारी हा आत्महत्येचा प्रकार उघडकीला आला. लोको पायलट सुजीत जयंत यांनी आत्महत्या केल्याचे समजाच मध्य रेल्वे मार्गावरील बहुतांशी लोको पायलट रविवारी दुपारी कल्याण पूर्वेतील लोको पायलट कार्यालय, रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयासमोर जमा झाले होते. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून सुजीतने आत्महत्या केल्याचा आरोप सुजीत यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. तसेच दोषी अधिकाऱयावर कारवाई करण्याची मागणीही या सहकाऱ्यांनी केली आहे.
तीन महिन्याचे वेतन रोखले : मृत सुजीत जयंत यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे अंतर्गत विविध प्रकारच्या परीक्षा देऊन आम्ही पदोन्नत्ती प्राप्त करतो. अशाच प्रकारच्या कसोटी परीक्षा सुजीत यांनी देऊन ते खात्यांतर्गत त्यांचे पुढील टप्पे यशस्वीपणे गाठत होते. आकसापोटी सुजीत यांना मागील तीन महिन्यांपासून गैरहजर दाखविण्यात येत होते. चौथा महिना आला तरी त्यांना कामावर हजर करुन घेतले जात नव्हते. त्यांचे तीन महिन्यांचे वेतन रोखण्यात आले होते. त्यामुळे घरभाडे, कुटुंब चालविण्याचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला होता.