ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिसांत सेवेस असलेल्या शितल मल्लिकार्जुन खरटमल यांना ग्रो ग्रीन फाऊंडेशन तर्फे, 'भारत श्री' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मध्यप्रदेशमधील इंदोर येथे नुकत्याच पार पडलेल्या गौरव सोहळ्यात शितल यांना क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी करता हा पुरस्कार देण्यात आला आहे. शितल खरटमल यांनी ज्यूडो, कराटे आदी सेल्फडिफेन्स क्रीडा प्रकारात यश मिळवले असून, त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये देशाला पदके मिळवून दिली आहेत.
अनेक अंतर राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत : शितल यांनी तब्बल १८ वेळा आंतरराष्ट्रीय ज्यूडो मार्शल स्पर्धामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना ६७ सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यात २०२२ मध्ये युरोपमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. शितल यांना २०२० मध्ये पंजाब सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन गौरवले होते. याशिवाय २०२१ मध्ये भारत भूषण पुरस्कारासह विविध ३७ पुरस्कार शितल यांना मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या स्वयंसिद्धा शिबिराच्या माध्यमातून सुमारे १२ हजार मुलींना स्वसंरक्षणासाठी धडे दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय बेल्ट रेस्लींग प्रकारात कांस्यपदक : याआधी युरोप देशातील बाकु आझर भाईजान येथे २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट व मास्क रेसलींग चॅम्पिअनशिपमध्ये उझेकिस्तान, अझरभाईजान, किर्गिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा विविध देशांतील स्पर्धकांशी स्पर्धा करीत ठाणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या, शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांनी आंतरराष्ट्रीय बेल्ट रेस्लींग प्रकारात कांस्यपदक व मास्क रेसलिंग प्रकारात रौप्यपदक प्राप्त करून देत देशाचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे.