महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रमिकांसाठी पोलीस प्रशासन सज्ज; तब्बल 60 हजार ई-पासेसद्वारे दीड लाख नागरिकांची पाठवणी - migrants in thane

ठाणे पोलीस आयुक्तालयातील पाच परिमंडळात 1 ते 20 मे दरम्यान तब्बल 20 हजार ऑनलाईन तर, 40 हजार ऑफलाईन पासेस वितरीत करून सुमारे दीड लाखांच्या आसपास नागरिकांना प्रवासाची अनुमती दिली आहे. दरम्यान, काही त्रुटी व तांत्रिक बाबींमुळे अंदाजे 10 हजार अर्ज प्रलंबित आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली.

श्रमिकांसाठी पोलीस प्रशासन सज्ज; तब्बल 60 हजार ई-पासेसद्वारे दीड लाख नागरिकांची पाठवणी

By

Published : May 23, 2020, 6:27 PM IST

ठाणे -लॉकडाऊन कालावधीत घराची ओढ लागलेल्या श्रमिकांचे मूळगावी प्रयाण सुरूच आहे. दररोज रेल्वे, एसटी बसेस तसेच व्यक्तीगत वाहनांद्वारे ही मंडळी रवाना होत असल्याने सर्वांना प्रवासाची परवानगी (ई-पासेस) देण्यासाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र राबत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील पाच परिमंडळात 1 ते 20 मे दरम्यान तब्बल 20 हजार ऑनलाईन तर, 40 हजार ऑफलाईन पासेस वितरीत करून सुमारे दीड लाखांच्या आसपास नागरिकांना प्रवासाची अनुमती दिली आहे. दरम्यान, काही त्रुटी व तांत्रिक बाबींमुळे अंदाजे 10 हजार अर्ज प्रलंबित आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मजूर, कामगार व हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांचे हाल होऊ लागले. त्यामुळे, अनेकांनी कुटुंबासह पायपीट तसेच मिळेल त्या वाहनाने गावाकडे धाव घेतली. यासाठी लागणारे ई-पासेस, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या निर्देशाने 1 ते 5 परिमंडळातील संबधित क्षेत्रातील पोलीस ठाण्यातून देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार, 1 ते 20 मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज केलेल्या 19 हजार 361 ई-पासेसच्या माध्यमातून 78 हजार 859 प्रवाशांना अनुमती देण्यात आली, तर, 40 हजार ऑफलाईन अर्जांनाही मंजुरी दिली असून तब्बल 10 हजार अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.

दरम्यान, 3 ते 22 मे या कालावधीत ठाणे, कल्याण व भिवंडी रोड स्थानक येथून 22 ट्रेन्समधून 30,958 श्रमिकांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यात आले. यात बिहार राज्यातच तब्बल 14 आणि 5 ट्रेन्स उत्तर प्रदेशमध्ये सोडल्या आहेत, तर, 10 ते 20 मे या दहा दिवसात 1691 एसटी बसेसमधून 43 हजार 111 श्रमिकांना राज्यांच्या सीमेपर्यत सोडण्यात आले असून अद्याप ही सेवा सुरूच असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details