नवी मुंबई -कौटुंबिक भांडणाचा राग मनात धरून पश्चिम बंगाल येथून मुंबईत आलेल्या तरुणीची वाशी पोलिसांनी तिच्या घरच्यांशी भेट घडवून आणली आहे. भांडण झाल्यानंतर आजीचे घर सोडून नवी मुंबईत आलेल्या तरुणीच्या आई-वडिलांचा शोध घेऊन वाशी पोलिसांनी तिला त्यांच्या ताब्यात दिले आहे.
भांडणानंतर घरातून निघून आली पश्चिम बंगालची तरुणी, आईवडिलांचा शोध घेत दिले ताब्यात वाशी रेल्वे स्थानक परिसरात रात्री 2:30 च्या दरम्यान एकटी आढळली तरुणी: वाशी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले व सध्या कोपरखैरणे येथे बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे व इतर पथके रात्रपाळी करत गस्त घालत असताना त्यांना 26 डिसेंबरला रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास वाशी रेल्वे स्थानक परिसरात एक तरुणी एकटीच आढळून आली. तिच्याकडे विचारपूस केली असता, तिने तिचे नाव श्रेया मुजुमदार (वय 27) असल्याचे सांगत ती पश्चिम बंगालच्या कोलकात्यातील बेहरामपूर येथे राहत असल्याची माहिती दिली. तसेच, ती घरगुती भांडणातून तिच्या आजीच्या घरातून निघून आली असून तिचे नवी मुंबई किंवा मुंबई येथे कोणीही नातेवाईक नसल्याची माहिती तिने दिली. यानंतर पोलिसांनी या तरुणीला तिच्या घरच्यांकडे पाठवण्यासाठी हालचाली सुरू केल्या.
हेही वाचा -दिग्रस-मानोरा रस्त्यावरील जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली; पाण्याचा अपव्यय
पैसे नसल्याने 3 ते 4 दिवस वाशी रेल्वे स्थानकात राहत होती तरुणी:
वाशी रेल्वे स्थानक परिसरात आढळलेली श्रेया पैसे नसल्याने 3 ते 4 दिवसापासून वाशी रेल्वे स्थानक परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिने तिला कुठेतरी तात्पुरत्या निवासाची आवश्यकता असल्याचे सांगत पोलिसांना मदतीची विनंती केली. पोलिसांनी तिला वाशी पोलीस ठाण्यात आणून तिची महिला पोलिसांकडून सविस्तर विचारपूस करून घेतली. यानंतर या तरुणीची महिला कक्षात राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी नातेवाईकांशी संपर्क होईपर्यंत तिची व्यवस्था भार्गवी शंकर चॅरिटेबल ट्रस्ट, सेक्टर 12, खारघर, नवी मुंबई येथे केली होती.
भार्गवी शंकर चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापकांच्या मदतीने घेतला पोलिसांनी तरुणीच्या पालकांचा शोध:
पोलिसांनी भार्गवी शंकर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन आचारी यांच्या मदतीने तरुणीच्या पालकांचा शोध घेतला. ही तरुणी बारासात, चोवीस परगणा, पश्चिम बंगाल येथून तिच्या आजीच्या घरून काहीही न सांगता निघून गेली असल्याने बारासात पोलीस ठाणे येथे ती हरवल्याबाबत तक्रार नोंद करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांशी व नंतर तिच्या पालकांशी संपर्क करून त्यांना नवी मुंबई येथे बोलावले. 10 जानेवारीला संबधित तरुणीचे पालक नवी मुंबई येथे येताच भार्गवी चॅरिटेबल ट्रस्ट, सेक्टर 12, खारघर येथे या तरुणीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले.
हेही वाचा -जाळ्यात अडकलेल्या फिनलेस पॉरपॉईझ माशाला मच्छिमारांनी दिले जीवदान