ठाणे - लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेले अपमानास्पद आहे, असे म्हणत त्या वक्तव्या विरोधात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरापुढे निदर्शने करत माफी मागो आंदोलन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मुंबई-नाशिक महामार्गाला लगत दिवे या गावी असलेल्या बंगल्या समोर आंदोलन करण्याचा निर्णय ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार काँग्रेस कार्यकर्ते राजनोली नाका येथे जमा झाले. मात्र, केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या बंगल्यापासून 3 किलोमीटर अंतरावर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाल्याचे दिसून आले.
भाजपा युवा कार्यकर्त्यांचे प्रत्युत्तर -काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी येणार असल्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते तद्पूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या बंगल्यासमोर एकत्रित झाले होते. त्यांनी समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची हवाच काढून घेतल्याचे चित्र समोर आले आहे.