ठाणे - गेल्या 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस ठाणे पोलीस आयुक्त पद रिकामे आहे. त्यामुळे सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयाची नेतृत्वहीन अशी परिस्थिती झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची बदली झाल्यानंतर या पदी अनेकजण गुडघ्याला बाशिंग लावून बसले होते. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंग यांची वर्णी ठाणे पोलीस आयुक्तपदी लागल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
ठाणे पोलीस आयुक्तपदाकडे दुर्लक्ष?
जवळपास 30 ते 35 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या ठाणे पोलीस आयुक्तालयावर अवलंबून आहे. ठाणे ते भिवंडी, अंबरनाथपर्यंतच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ठाणे पोलीस आयुक्तालयावर आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पोलीस दलातील महत्त्वाच्या पदांवरील अनेक मोठमोठ्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, ठाणे पोलीस आयुक्तपदाकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे परिस्थिती पुन्हा बिघडू नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्तपदी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी आता ठाणेकर करू लागले आहेत.
हेही वाचा -तौक्ते वादळ : ४ दिवसात मुंबईच्या किनाऱ्यावर आलेला १५३ टन कचरा पालिकेने उचलला